Dragon Fruit Farming : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शेतीमध्ये बदल करत आहेत. विशेषता पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून अख्या महाराष्ट्राचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. अशाच नवीन प्रयोगापैकी एक प्रयोग जिल्ह्यात केला जात आहे तो ड्रॅगन फ्रुट लागवडीचा.
ड्रॅगन फ्रुट ची लागवड जिल्ह्यात प्रामुख्याने इंदापूर तालुक्यात पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे ड्रॅगन फ्रुट लागवडीखालील क्षेत्र तालुक्यात वधारत आहे. या पिकाच्या शेतीतून शेतकऱ्यांना एकरी सात ते आठ लाखांची उत्पन्न मिळत असल्याने अनेकांना आता ड्रॅगन फ्रुट ची भुरळ पडत आहे. अनेक प्रयोगशील शेतकरी या पिकाच्या लागवडीकडे वळले आहेत.
तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या पिकाची लागवड ही पावसाळ्यात होते. पाऊस पडला की या पिकाला फुलधारणा होते. साधारणतः फुलधारणा झाल्यानंतर या पिकापासून दीड ते दोन महिन्यात उत्पादन मिळते किंवा फळ तयार होतात. जून ते डिसेंबर पर्यंत या झाडापासून चार ते पाच वेळा उत्पादन घेता येते.
साधारणता एका एकरात आठ टन पर्यंतचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. याला प्रति किलोला 50 ते 200 रुपये असा भाव मिळत आहे. त्यासाठी लागवडीचा खर्च मात्र खूप आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका एकरात ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी पाच लाखाचा खर्च येतो. यासाठी मात्र शासन एक लाख 80 हजारापर्यंतचे अनुदान देत आहे.
कशी करणार लागवड?
ड्रॅगन फ्रुट साठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आवश्यक असते. ज्या ठिकाणी पाणी साचत अशा ठिकाणी ड्रॅगन फ्रुट लागवड करू नये. अशा ठिकाणी ड्रॅगन फ्रुट पासून अपेक्षित उत्पादन मिळत नाही. ड्रॅगन फ्रुट लागवड करताना झाडांमधील अंतर आठ फूट आणि दोन ओळींमधील अंतर बारा फूट ठेवावे. ड्रॅगन फ्रुट लागवड करण्यासाठी खड्डे खोदल्यानंतर पोल उभा करावा लागतो, अन पोलवर गोल सर्कल किंवा चौकोनी खिडकी बसवावी लागते. या पोलच्या चारी बाजूला चार ड्रॅगन फ्रुट ची रोपे लावली जातात. हि रोपे मग वाढल्यानंतर खांबाला बांधली जातात. मग वर त्याचा विस्तार केला जातो.
या जातींची करा लागवड
ड्रॅगन फ्रुट च्या अनेक जाती आहेत मात्र महाराष्ट्रात प्रामुख्याने जातींची प्रामुख्याने शेती होत आहे. जम्बो रेड, जीए रेड आणि एलो रेड या तीन जाती आहेत ज्या महाराष्ट्रात तसेच इंदापूर परिसरात मोठ्या प्रमाणात उत्पादित होत आहेत.
असं करा व्यवस्थापन
खरं पाहता ड्रॅगन फ्रुट पिकासाठी फवारणीचा अधिकचा खर्च करावा लागत नाही. रासायनिक खते खूपच कमी प्रमाणात वापरली जातात. सेंद्रिय खते जसे की गांडूळ खत, शेणखत, लिंबोळी खत यांचा अधिक वापर होतो. एकरी साधारणता 50 हजारापर्यंत चा खर्च हा व्यवस्थापनासाठी येत असतो. मात्र गोगलगाय आणि मुंग्यांचा प्रादुर्भाव पिकामध्ये होऊ देऊ नये यासाठी कीटकनाशकाची फवारणी करण्याचा सल्ला तज्ञ देतात.