Successful Farmer : शेती गेल्या काही वर्षांपासून आव्हानात्मक बनली आहे. वेगवेगळ्या नैसर्गिक संकटांमुळे तसेच शेतमालाला कमी दर मिळत असल्याने बळीराजा संकटात आला आहे. आसमानी आणि सुलतानी संकटांमुळे बळीराजा भरडला जात आहे. पारंपारिक पिकांच्या शेतीत दिवसेंदिवस उत्पादन खर्च वाढत आहे. इंधनाच्या किमती मोठ्या विक्रमी वाढल्या असल्याने कृषी निवेष्ठांच्या किमती देखील वाढल्या आहेत. परिणामी शेती मधला खर्च हा दुपटीने वाढला आहे. महागाई वाढत असल्याने मजुरांचे मजुरीचे दर देखील वाढले आहेत.
यामुळे शेतीमधून मिळणारे उत्पादन वाढत्या महागाईच्या तुलनेत खूपच तोकडं असून आता शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील ऐरणीवर येऊ लागला आहे. अख्या जगाचा पोट भरणाऱ्या बळीराजाला आता आपल्या उदरनिर्वाहासाठी देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र शेतकऱ्यांनी यामधून देखील मार्ग शोधण्यास सुरुवात केली असून वेगवेगळे प्रयोग शेतीमध्ये राबवले जात आहेत. विशेष बाब म्हणजे हे नवीन प्रयोग शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर ठरत आहेत.
हे पण वाचा :- ‘या’ भागात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार; गारपिट पण होणार, भारतीय हवामान विभागाचा इशारा
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात देखील असाच एक नवीन प्रयोग पाहायला मिळाला आहे. तालुक्यातील चिंचोली देशपांडे या गावातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने एकाच शेत जमिनीत शेवगा वांगा आणि कांदापात या तीन पिकांची लागवड यशस्वी करून दाखवली आहे. हा मिश्र शेतीचा प्रयोग या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरला असून वांगी, शेवगा आणि शेवग्याचा पाला तसेच कांदापात विक्रीतून हा शेतकरी आता आर्थिकदृष्ट्या समृद्ध बनला आहे. त्यामुळे सध्या पंचक्रोशीत या शेतकऱ्याची चर्चा आहे.
चिंचोडी देशपांडे येथील राजू केशव शेवाळे या प्रयोगशील शेतकऱ्याने ही किमया साधली आहे. शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची जमीन ही मुरमाड जमीन आहे. या जमिनीवर त्यांनी चार वर्षांपूर्वी शेवगा लागवड केली. आता त्यांना या शेवग्याच्या पिकातून उत्पादन मिळू लागले आहे. 70 रुपये प्रति किलो असा शेवग्याला दर मिळत असून आतापर्यंत 400 किलो उत्पादन त्यांना शेवगा पिकातून मिळाले आहे. शेवाळे सांगतात की त्यांनी मुख्य जमिनीवर शेवगा लागवड न करता शेताच्या बांधावर शेवगा लागवड केली आहे.
त्यामुळे त्यांना मुख्य जमिनीत इतर पिके घेता येतात. मुख्य जमिनीत त्यांनी वांगी आणि वांग्यामध्ये आंतरपीक म्हणून कांदापात लागवड केली आहे. म्हणजेच एकाच जमिनीत तीन प्रकारचे पिके त्यांनी घेतली आहेत. शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी वांग्याच्या ब्रिंजल नागपुरी या जातीची लागवड केली आहे. ही जात ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक सेवन केली जाणारे वांग्याची जात आहे. त्यामुळे बाजारात याला चांगली मागणी आणि दर मिळत आहे. वांग्याची आणि कांदा पातीची विक्री मॉलमध्ये होत असून यामुळे त्यांना शाश्वत उत्पन्न मिळत आहे.
तसेच शेवगाच्या शेंगा 70 रुपये प्रति किलो या दरात विक्री होत आहेत आणि शेवग्याचा पाला 75 रुपये प्रति किलो या भावाने विकला जात आहे. म्हणजेच त्यांना एकाच पिकापासून दोन प्रकारचे उत्पादन मिळत आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात त्यांनी वांग्याची लागवड केली होती आणि त्यामध्येच आंतरपीक म्हणून कांदापात लागवड त्यांनी केली होती. एकंदरीत हा मिश्र पीक लागवडीचा प्रयोग या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरला असून असेच प्रयोग शेतकऱ्यांना करावा लागणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
हे पण वाचा :- राजधानी मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ विभागात निघाली मोठी भरती; पहा भरतीची सविस्तर माहिती