अमरावती, दि. 28 : कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. या काळात अवैध दारूनिर्मिती व विक्री होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
कायद्याचा धाक नसेल तर असे प्रकार फोफावतात. त्यामुळे अशा प्रकारांविरुद्ध कठोरपणे कारवाई करावी व विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, अवैध दारूची निर्मिती, परराज्यातून दारू येणे व त्याची विक्री होणे असे प्रकार घडत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. अवैध दारूमुळे घातक परिणाम होऊन बळी जाण्याचाही संभव असतो.
त्याशिवाय, अशा प्रकारांचे इतर सामाजिक दुष्परिणामही होत आहेत. कौटुंबिक हिंसाचारातही वाढ झाली आहे. त्यामुळे विशेष मोहिम हाती घेऊन ठिकठिकाणी छापे टाकणे व संबंधितांवर कठोर कारवाई करावी. त्यासाठी स्वतंत्र पथकांची निर्मिती करावी. या कारवायांत सातत्य ठेवावे जेणेकरून समाजकंटकांवर वचक राहील.
शेतमाल खरेदी विक्रीचा आढावा
यावेळी पालकमंत्र्यांनी शेतमाल खरेदीविक्रीचाही आढावा घेतला. हरभरा, तूर व कापूस या शेतमालाची नाफेड आणि सीसीआय यांना विक्री करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात आली. आजमितीस शेतकऱ्यांचा हरभरा, तूर, कापूस या शेतमालाची शासकीय खरेदी केंद्रामार्फत खरेदी सुरु झालेली आहे. मात्र, या प्रक्रियेला गती देणे आवश्यक आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्याकरीता ‘सोशल डिस्टन्स’ पाळणे आवश्यक आहे. मात्र, खरेदीची गतीही वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी सुरक्षितता राखून अधिक केंद्रे उघडून खरेदी केल्यास खरेदीला गती मिळेल व गर्दीही होणार नाही, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
माहिती दडवणे हे सर्वात धोकादायक
पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी शासन, प्रशासनाकडून विविध पावले उचलण्यात येत आहेत. सतत व अथक प्रयत्न होत आहेत. या काळात नागरिकांनीही माहिती देण्यासाठी पुढे आले पाहिजे. सर्दी, खोकला आदी कुठलाही आजार असेल तर सरकारी दवाखान्यात जाऊन तपासणी केली पाहिजे.
माहिती दडवल्याने नंतर आजार वाढू शकतो. त्यामुळे कुटुंबाला, परिसराला संसर्ग होण्याचा धोका वाढतो. वेळीच योग्य उपचार केल्यास रुग्ण बरा होतो.
जिल्ह्यात प्रारंभी आढळलेले चार रूग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. त्यामुळे घाबरून जाण्यासारखे काही नाही. मात्र, माहिती दडवून ठेवणे हे धोकादायक आहे. त्यामुळे आपण आपल्यासह आपल्या कुटुंबाला व परिसराला धोक्यात टाकत आहोत, याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये व त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वेळेत व्हावा, यासाठी विविध निर्णय घेतले आहेत.
गर्दी टाळण्यासाठी कृउबास भाजी बाजार बंद केला असला तरीही नागरिकांना ताज्या भाज्या मिळाव्यात यासाठी फार्म टू फॅमिली हा उपक्रम राबविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
त्यामुळे शेतकरी बांधव थेट ठिकठिकाणच्या ग्राहकांपर्यंत पोहोचून भाजीपाला त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतील. यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही व शेतकरी बांधवांनाही भाजीपाल्याची विक्री करता येणे शक्य होईल.
कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने संचारबंदी अधिक कठोर केली आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदी विक्रीची वेळ सकाळी 8 ते 12 केली आहे. गर्दी व नागरिकांचा वावर टाळणे व सुरक्षितता जपणे असा त्याचा हेतू आहे.
या पार्श्वभूमीवर दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब होतो किंवा कसे, याची तपासणी व नियमभंग आढळल्यास कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
नागरिकांनीही केवळ आवश्यक कारणांसाठीच बाहेर पडावे. मात्र, सावध व सजग राहून आवश्यक वस्तू घ्याव्यात. सोशल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहनही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले.