मुंबई, दि.२८: देहविक्रय करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांच्या समस्यांकडे एरवी समाजाचे लक्ष जात नाही. या व्यवसायात नाईलाजाने आलेल्या महिलांची परिस्थिती सुधारण्यासाठी, त्यांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी महिला व बालविकास विभाग प्रयत्न करतो.
सध्याच्या ‘कोविड-19’ परिस्थितीत लॉकडाऊनमुळे या महिलांचे उत्पन्न बंद झाल्याने कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी विभागाच्या सर्व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन देहविक्रय व्यवसायातील महिलांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू तसेच व्यक्तिगत स्वच्छता साधने पुरविण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार आतापर्यंत राज्यातील या व्यवसायातील सुमारे साडेबारा हजार महिलांपर्यंत पोहोचत त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था राज्य शासनाने केली आहे.
लॉकडाऊनमुळे संपूर्ण समाजालाच अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः हातावर रोज काम केल्याशिवाय उदरनिर्वाह होऊ न शकणारे मजूर, कारखान्यातील, बांधकामावरील मजूर आदींच्याबाबतीत दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला.
देहविक्रय करणाऱ्या महिलांपुढेही गंभीर समस्या उभी राहिली आहे. हे लक्षात येताच मंत्री श्रीमती ठाकूर यांनी तात्काळ विभागाच्या सचिव, महिला व बालविकास आयुक्त आदींसह व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना या महिलांना मदत उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा त्वरित गतिमान करण्याचे निर्देश दिले.
या कामात स्वयंसेवी संस्थांनीही शासनासोबत काम करत खूप चांगले सहकार्य केले आहे.
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर या शहरात देहविक्रय व्यवसायातील महिला मोठ्या संख्येने आहेत. मुंबई शहर जिल्ह्यातील कामाठीपुरा, फोकलँड, खेतवाडी, सिप्लेक्स बिल्डिंग, अँटॉप हिल, पारस रोड, दामोदर मॅन्शन या क्षेत्रात देहविक्रय करणाऱ्या महिला राहत आहेत. या महिलांच्या मुलांसाठी दिवसरात्र खुली निवारागृहे चालविली जात आहेत.
शासनासोबतच १५-१६ सामाजिक संस्था त्यांच्यासाठी काम करत असून महानगरपालिकेमार्फत अन्नाचे डबे त्यांच्यापर्यंत पोहोचविले जात आहेत. या महिलांना पुढील १५ दिवस पुरेल इतके अन्नधान्याचे (रेशन) किट पुरविण्यात आले असून त्यानंतरही महिनाभराचे रेशन पुरविण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे.
त्याचबरोबर सॅनिटायजर्स, सॅनिटरी किट, सोया बिस्किटे व इतर खाद्य वस्तू या वस्त्यांमध्ये पुरविण्यात येत आहेत. अन्नधान्य पुरवठ्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या वतीने मोफत सुलभ शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. ‘एचआयव्ही’ग्रस्त महिलांसाठी ‘एआरटी’ उपचारपद्धती सुरू असून नियमितपणे औषधे पुरविण्यात येत आहेत.
पुणे जिल्ह्यात सुमारे २ हजार ५०० महिला देहविक्रय व्यवसायात असून त्यांच्यासाठी काम करणाऱ्या १२-१३ संस्थांनी पोलिसांच्या मदतीने त्यांच्यापर्यंत अन्नधान्य, रेशन किट, सॅनिटरी किट पोहोच केले आहे. फरासखाना पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी या मदत कार्यात विशेष भूमिका बजावली आहे. तसेच आरोग्य विभागाकडून नियमित आरोग्य तपासणी केली जात आहे.
बुधवार पेठमध्ये देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांची संख्या मोठी असून त्यांच्यासाठी शासकीय दूध योजनेतून दुधाचा पुरवठा करण्यात येत आहे. यासाठी कात्रज दूध संघाने मदत केली आहे. ‘सहेली’ संस्थेने येथील महिलांचे मोबाईल रिचार्ज केले असून त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाशी संवाद साधता येत असल्याने मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी त्याची मदत झाली आहे.
नाशिक, अहमदनगर, नागपूर आदी मोठ्या शहरांसोबतच सर्वच जिल्ह्यात या महिलांसाठी रेशन किट वाटप, सॅनिटरी किट वाटप आदी उपक्रम सुरू असून अनेक स्वयंसेवी संस्था तसेच या महिलांच्या मुलांसाठी चाईल्डलाईन संस्था काम करत आहे.
काही जिल्ह्यात नोंदणी नसलेल्या छुप्या पद्धतीने देहविक्रय व्यवसायात महिला असून त्यांनाही मदत मिळावी यासाठी महिला व बालविकास विभाग अन्य शासकीय यंत्रणा तसेच स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. या व्यवसायातील शिधापत्रिका नसलेल्या महिलांनाही शासनाच्या वितरण व्यवस्थेमार्फत रेशन पुरवठा व्हावा यादृष्टीने पाठपुरावा सुरू आहे.