Agriculture News : राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे खरिपाच्या सोयाबीन, कपाशीच्या पेरण्या लांबल्या आहेत. तर ज्यांनी अल्प पावसावर व ओलीवर लागवड केली होती,
ते उगवून आलेले रोपटेही पुरेशा ओलीमुळे आणि ऊन, वारा यामुळे करपू लागले आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत चांगला पाऊस झाला नाही, तर रब्बीनंतर खरीपही हातचा जातो की काय? अशी चिंता सतावू लागली आहे.
राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील वळण, मानोरी, आरडगाव, केंदळ खुर्द, मांजरी, चंडकापूर, माहेगाव, खुडसरगाव, टाकळीमियाँ, मुसळवाडी, पिंपरी वळण, कोंडवड, शिलेगाव आदी गावांच्या क्षेत्रातील जमिनी अद्यापही पेरणीशिवाय पडीक पडून आहेत.
या भागात मागील वर्षीदेखील खरीपाची पिके फारशी हाती लागली नाहीत. कांदा, कापूस, सोयाबीन ही पिके काही ठिकाणी अतिवृष्टी, सततच्या पावसाने नुकसान झाल्यामुळे अल्प प्रमाणात शेतकऱ्यांच्या पदरात पडले; परंतु या पिकांनाही समाधानकारक व उत्पादन खर्च जाऊन काही पदरात पडेल असा भाव मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी पिके घरात घालून ठेवले व भाव वाढण्याची वाट पाहू लागले;
परंतु पुढील पेरणीचा काळ जवळ आला तरीदेखील अद्याप भाव वाढून तर नाहीच; पण सुरुवातीला होता त्यातही पेक्षा कमी भाव सध्या मिळत आहे. त्यामुळे भाव वाढीच्या आशेने ठेवलेला कांदा व कापूस अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये पडून आहे.
कांद्याला किमान दोन हजार रुपये तर कापसाला आठ ते १० हजार रुपये तरी भाव मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. या आशेने शेतकऱ्यांनी कांदा, कापूस साठवून ठेवलेला आहे. कांदा आता उष्णतेने व दमट वातावरणाने खराब होत असून त्याच्या निगराणीसाठीच शेतकऱ्यांना खर्च करावा लागत आहेत.
दुसरीकडे कापसाला केवळ सहा ते सात हजार रुपये असा अल्पभाव मिळाल्याने तोही घरात पडून आहे. तयार झालेल्या मालाला भाव नाही. ही परिस्थिती असल्याने शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत असतानाच पुन्हा वेळेवर खरिपाची पेरणी करू शकत नसल्याने दुहेरी संकट शेतकऱ्यांपुढे उभे टाकले आहे.
येत्या दोन-चार दिवसांत पाऊस होणे खूप गरजेचे असल्याचे शेतकरी सांगताहेत. निदान उशिरा का होईना पण पिक घेणे गरजेचे आहे. अन्यथा शेती पडीक पडून राहिल्यास पुढील वर्षी आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागेल, अशी चिंता शेतकऱ्यांना सतवू लागली आहे. सध्या तरी सर्वांचे डोळे दमदार अशा पावसाकडे लागले आहे.