EPF Rules In Marathi : फक्त याच कारणांसाठी तुम्ही काढू शकतात नोकरी करत असताना ईपीएफओ मधील पैसे:- आपल्यापैकी बरेच जण सरकारी किंवा खाजगी नोकरी करत असतात. नोकरी करत असताना अशा कर्मचाऱ्यांना जो काही पगार मिळतो त्या पगारातून प्रत्येक महिन्याला कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या माध्यमातून काही रक्कम ही कापली जाते व अशा पद्धतीने जी रक्कम जमा होते त्या रकमेवर सरकारच्या माध्यमातून व्याज दिले जाते.
जर आपण पीएफचा विचार केला तर कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर जमा झालेली आयुष्याची पुंजी कर्मचाऱ्यांना नंतरच्या काळामध्ये कामी येते. परंतु जीवन जगत असताना बऱ्याचदा काही कारणास्तव आर्थिक संकट कोसळते व व्यक्तीला पैशांची गरज भासते. कधीकधी नोकरी देखील गेल्यामुळे बिकट परिस्थिती उद्भवते.
मग अशा वेळेस तुमचा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओ मध्ये जी रक्कम जमा झालेली आहे ती तुम्हाला काढता येते का? हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जर तसे पाहायला गेले तर ही रक्कम साधारणपणे दोन परिस्थितीमध्ये काढता येते. एक म्हणजे जर कर्मचाऱ्यांची नोकरी गेली आणि कर्मचारी दोन महिने बेरोजगार असेल तेव्हा आणि दुसरे म्हणजे तो निवृत्त झाल्यानंतर.
परंतु काही अत्यावश्यक कारणांकरिता तुमची इच्छा असेल तर तुम्ही या पीएफ मधून अंशिकरित्या पैसे काढू शकतात. परंतु याकरिता काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती देखील आहेत आणि त्या तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. त्यामुळे या लेखात आपण याबद्दलचे महत्त्वाची माहिती घेऊ.
नोकरी करत असताना पीएफ मधून पैसे काढण्यासाठीचे नियम
1- घर बांधकाम किंवा जमीन खरेदी– एखादा कर्मचारी पाच वर्षे सतत सेवा बजावत असेल तर अशा कर्मचाऱ्याला घराच्या बांधकामासाठी किंवा घर खरेदी करण्याकरिता किंवा आहे त्या घरामध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर तो काही रक्कम काढू शकतो.परंतु यामधून रक्कम काढताना त्याचा नियम असा आहे की ठराविक मर्यादेपर्यंतच तुम्हाला काही रक्कम काढता येते. म्हणजेच तुम्हाला जो काही मासिक पगार आहे त्याच्या 24 पट आणि घराचे बांधकाम किंवा घराची खरेदी करायची असेल तर तुमच्या मासिक पगाराच्या 36 पट इतकीच रक्कम तुम्ही काढू शकता.
2- घरातील विवाहाचा कार्यक्रम किंवा मुला मुलींचे शिक्षण– समजा घरातील तुमची बहीण किंवा मुलगा, मुलगी किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याचे लग्न असेल किंवा तुमचे स्वतःचे किंवा मुलांचे शिक्षणाचा खर्च असेल तर याकरिता तुम्ही ईपीएफ मधून काही पैसे काढू शकता. परंतु यासाठी पैसे काढायचे असेल तर तुम्ही सात वर्षे सेवेत असणे गरजेचे आहे. सात वर्षाच्या सेवेनंतर तुम्ही तुमच्या पीएफ मध्ये जमा झालेल्या रकमेच्या 50% पर्यंत रक्कम काढू शकता.
3- दवाखान्याचा अर्थात वैद्यकीय खर्च– बऱ्याचदा अचानक गंभीर स्वरूपाचे आजार होतात किंवा अपघातामुळे अपंगत्व देखील येते. असेच तुम्ही ज्या कंपनीमध्ये किंवा फर्म मध्ये काम करत असतात ते बंद होते. त्यामुळे अशा आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या ईपीएफ खात्यामधून कुठल्याही प्रकारच्या अटीशिवाय पैसे काढू शकतात.
इतर काही महत्त्वाचे नियम
तसेच या व्यतिरिक्त तुम्ही ज्या कंपनीत काम करत आहात ती जर 15 दिवसांपेक्षा जास्त काळ बंद असेल तरी तुम्ही तुमच्या ईपीएफ खात्यात जमा झालेली संपूर्ण रक्कम काढू शकतात. यासोबतच तुमची नोकरी गेली असेल किंवा तुम्ही नोकरी सोडली असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एका महिन्याच्या कालावधीनंतर जर काही निधी काढायचा असेल तर तुम्ही जमा रकमेच्या 75 टक्के रक्कम या माध्यमातून काढू शकतात.
तसेच तुम्ही सलग दोन महिने बेरोजगार असाल तरी तुम्हाला तुमच्या ईपीएफ ची संपूर्ण रक्कम मिळू शकते.यामध्ये तुम्हाला काही फॉर्म सबमिट करणे गरजेचे असते. समजा तुम्हाला जर पीएफ मधील संपूर्ण जमा झालेल्या निधी काढायचा आहेत तर तुम्हाला पीएफ विड्रॉल फॉर्म 19 चा वापर करणे गरजेचे आहे. तसेच तुम्हाला जमा झालेल्या रकमेमधून काही भाग काढायचा असेल तर तुम्हाला पीएफ विड्रॉल फॉर्म 31 आवश्यक असतो.