Success Story :- सध्या अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवडीकडे वळले आहेत. हवामानातील बदल, बदललेली बाजारपेठांची स्थिती तसेच आधुनिकतेची कास व वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर यामुळे शेतकरी आता फळबाग लागवडीच्या माध्यमातून लाखो रुपये कमवत आहेत. याकरिता करावी लागणारे कष्ट, व्यवस्थित व्यवस्थापन आणि बाजारपेठेचा अभ्यास करून केलेले फळबागांचे नियोजन सार्थकी ठरताना दिसून येत आहे.
विपरीत नैसर्गिक परिस्थितीत देखील प्रचंड कष्टात फळबागा जोपासून शेतकरी चांगले पैसे मिळवत आहेत. डाळिंबाचा विचार केला तर प्रामुख्याने नासिक आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते व लागवड क्षेत्र देखील फार मोठ्या प्रमाणावर होते. परंतु नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर मागील काही वर्षांमध्ये डाळिंब बागांवर मर व तेल्या रोगाने थैमान घातल्यामुळे डाळिंबाच्या बागा शेतकऱ्यांना काढून टाकाव्या लागल्या.
त्याऐवजी शेतकरी इतर पिकांकडे वळले होते. परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून नवीन डाळिंब बागांची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असून परत नव्याने आणि जोमाने डाळिंब बागा या पट्ट्यांमध्ये फुलू लागल्या आहेत.अगदी याच पद्धतीने जर आपण माळशिरस तालुक्यात असलेल्या जांभूळ या गावचे अण्णा पाटील जांभूळ यांचे उदाहरण घेतले तर त्यांनी डाळिंबाच्या पंधराशे झाडांपासून 40 ते 50% उत्पन्न मिळवले आहे व या उत्पादित डाळिंबाची 170 रुपये प्रति किलोप्रमाणे विक्री देखील केली आहे. नेमके अण्णा पाटील यांनी कशा पद्धतीने या डाळिंब बागेचे नियोजन केले त्याबद्दलची माहिती आपण बघू.
डाळिंबाच्या उत्पन्नातून 70 लाखांची कमाई
याबाबत सविस्तर वृत्त असे की, माळशिरस तालुक्यातील जांभूळ या गावचे अण्णा पाटील जांभूळ यांनी डाळिंबाचे योग्य व्यवस्थापन करून 1500 डाळिंबाच्या झाडांपासून 40 ते 50 टन डाळींबाचे उत्पन्न मिळवण्यात यशस्वी झाले असून सध्या या डाळिंबाची निर्यात त्यांनी बांगलादेश या ठिकाणी केली आहे.
जवळजवळ 170 रुपये किलोचा दर त्यांना मिळालेला असून अजून उर्वरित 1500 झाडांपासून त्यांना एक कोटींच्या वर उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. साधारणपणे त्यांनी 3000 डाळींबाच्या झाडांची लागवड केली असून त्याकरिता त्यांना व्यवस्थापनावर व इतर बाबींवर साडेचार लाख रुपये खर्च आला. यामध्ये त्यांनी व्यवस्थापन करताना अतिशय चोखपणे केले व कमीत कमी खर्चात चांगले उत्पन्न कसे येईल याकडे लक्ष केंद्रित केले.
आतापर्यंत 40 ते 50 टन इतके डाळिंबाचे उत्पन्न त्यांना मिळालेले असून हे उत्पन्न अवघ्या पंधराशे झाडांवर त्यांना मिळालेले आहे. 170 रुपये प्रति किलो दराने डाळींब विक्री झाला असून जवळपास 70 लाखांपर्यंतची उत्पन्न त्यांनी मिळवलेले आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित नियोजन करून जर फळबाग लागवडीकडे लक्ष केंद्रित केले तर कमीत कमी खर्चामध्ये देखील लाखात उत्पन्न मिळवता येणे शक्य आहे हे अण्णा पाटील यांच्या उदाहरणावरून दिसून येते.