Onion Price:- कांदा म्हटले म्हणजे सगळ्यात अगोदर डोळ्यासमोर येतो तो नाशिक जिल्हा. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कांदा बाजारपेठा देखील नाशिक जिल्ह्यातच आहेत व कांद्याचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यातच होते. त्यानंतर महाराष्ट्रातील सोलापूर सारख्या जिल्ह्यात देखील कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होते व आता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात कांदा लागवड आता शेतकरी करू लागलेले आहेत.
संपूर्ण भारताचा विचार केला तर 58 लाख हेक्टर कांदा लागवडीखालील क्षेत्र असून यापैकी महाराष्ट्रात 30 टक्के क्षेत्रावर कांदा लागवड होते व देशातील एकूण उत्पादनाच्या 43% कांदा उत्पादन महाराष्ट्रात होते. परंतु कांद्याच्या बाबतीत विचार केला तर बाजारभावाच्या बाबतीत कायमच शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका कांद्याच्या बाजारभावामुळे बसतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर यावर्षी संपूर्ण हंगामामध्ये कांद्याचा उत्पादन खर्च देखील निघाला नाही.
त्यातल्या त्यात केंद्र सरकारची धोरणे देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूपच मारक आहे. यावर्षी देखील जरा कुठे कांद्याच्या दरात वाढ होताना दिसायला लागली व शेतकऱ्यांना थोडाफार फायदा होईल अशी स्थिती निर्माण झाली व त्याच वेळेस केंद्र सरकारने 40% कांद्यावर निर्यात शुल्क लागू केले. म्हणजेच शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचा विचार केंद्र सरकारच्या माध्यमातून जास्त केला जातो हे यावरून दिसून येते.
आता मागील एक ते दोन दिवसांअगोदर केंद्र सरकारकडून अधिसूचना काढण्यात आली व निर्यात शुल्क मागे घेण्यात आले. परंतु त्या ऐवजी आता किमान निर्यात मूल्य आठशे डॉलर निश्चित करण्यात आले. म्हणजे कुठल्या ना कुठल्या बाजूने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होईल अशाच पद्धतीचे धोरण केंद्र सरकारचे दिसून येते. या परिस्थितीमुळे कांदा उत्पादक शेतकरी हताश झालेले आहेत.
त्यातच कांदा हा नाशवंत असल्यामुळे त्याची काढणी पासून तर साठवणी पर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर कांद्याचे नुकसान होत असते. या सगळ्या कांद्याच्या बाजार भावाच्या भानगडीत न पडता जर तुम्ही कांद्यापासून काहीतरी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले तर नक्कीच तुम्ही या माध्यमातून लाखो रुपये कमवू शकतात हे मात्र निश्चित.
दरवर्षी आर्थिक फटका बसवून घेण्यापेक्षा एकदाच कांदा प्रक्रिया उद्योगाकडे वळणे हे शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायद्याचे ठरेल. याच दृष्टिकोनातून आपण या लेखात कांदा प्रक्रिया उद्योगामधील कांदा निर्जलीकरण म्हणजेच ओनियन डीहायड्रेशन म्हणजे नेमके काय असते याबद्दल माहिती घेऊ.
कांदा निर्जलीकरण म्हणजे सुकवलेला कांदा म्हणजे नेमके काय असते?
1- यामध्ये कांदा निर्जलीकरण करण्याकरिता किंवा कांदा सुकवण्यासाठी तुम्हाला प्रतवारी करून समान किंवा सारख्या आकाराचा कांदा असल्यास यांत्रिक पद्धतीने कांद्यावरील आवरणे काढून त्याचे काप करता येतात.
2- हाताने लघुउद्योग स्तरावर जर तुम्हाला प्रक्रिया करायचे असेल तर याकरिता प्रथम कांद्याच्या देठाकडील व मुळाकडील काही भाग कापून टाकावा.
3- त्यानंतर कांद्यावरील वाळलेली आवरणे काढून कांद्याचा 0.5 ते एक मीमी जाडीच्या यंत्राच्या मदतीने किंवा चाकूने काप करावे.
4- कांदा सुकवण्याची प्रक्रिया किंवा निर्जलीकरण करताना जर तुम्हाला काही अडचणींवर मात करायची असेल तर त्याकरिता तुम्हाला खालील पूर्व प्रक्रिया करणे आवश्यक असते.
कांदा निर्जलीकरणात समस्या येऊ नयेत म्हणून या पूर्व प्रक्रिया कराव्यात
1- कांद्याचे काप हे दोन टक्के तूरटीच्या द्रावणात एक तास बुडवून ठेवणे तसेच हे काप 0.05% पोटॅशियम मेटा बायसल्फेटच्या द्रावणात दहा मिनिट बुडवून ठेवणे यासारख्या पूर्व प्रक्रिया करणे गरजेचे आहे. अशा पद्धतीच्या प्रक्रिया जर केल्या तर पूर्व प्रक्रियेमुळे वाळलेला कांद्याचा रंग जास्त काळ टिकून राहतो व कांद्याचे पोषण गुणवत्तेवर देखील त्याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो.
2- कांद्याच्या निर्जलीकरण प्रक्रियेमध्ये कांद्यातील पाणी काढून टाकले जाते व त्याची साठवण क्षमता वाढवली जाते. वर सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही पूर्व प्रक्रिया केलेल्या कांद्याच्या चकत्या या वाळवणी यंत्रात ५५ अंश सेंटीग्रेड तापमानास त्यामधील पाण्याचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा कमी येईपर्यंत त्या वाळवाव्या लागतात.
3- वाळवणी यंत्रात तुम्हाला चकत्या सुकवायच्या असतील तर 12 ते 20 तासांचा कालावधी लागतो. यामध्ये जर तुम्ही लाल किंवा गुलाबी कांद्याचा वापर करत असाल तर त्या करता तुम्ही पाच टक्के मिठाच्या द्रावणात दोन टक्के कॅल्शियम क्लोराइड मिसळून त्यामध्ये कांद्याचे काप दहा ते पंधरा मिनिटे बुडवून नंतर सुकवले तर रंगात देखील सुधारणा येते. अशा पद्धतीने वाळवलेल्या कांद्यापासून तुम्ही कांद्याची पावडर किंवा तुकडे तसेच चकत्या व कांद्याचा कीस देखील तयार करू शकतात.
4- असे कांद्याचा कीस किंवा पावडर किंवा तुकडे तसेच चकत्या स्वरूपात तुम्ही सुकवलेला कांदा तीनशे ते चारशे गेज असलेल्या पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये भरून हवाबंद करणे खूप गरजेचे असते. अशाप्रकारे हवाबंद केलेला सुकवलेला कांदा सहा महिन्यांपर्यंत अगदी उत्तम स्थितीमध्ये राहतो.
5- अशा पद्धतीने निर्जलीकरण केलेल्या कांद्याचा उपयोग सुप तसेच केचप, स्वास, सॅलेड तसेच लोणची व ग्रेव्ही इत्यादी तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो.
कांद्याची पावडर तयार करून विक्री
याशिवाय तुम्ही कांदा सुखविल्यानंतर ग्राइंडर किंवा दळण यंत्रामध्ये त्याला ग्रँड किंवा दळून त्यापासून पावडर तयार करू शकतात. ही पावडर देखील तुम्ही हवा बंद करून स्वच्छ व कोरड्या जागेमध्ये साठवण करू शकतात. अशाप्रकारे कांद्याचा वापर हा काही देशांमध्ये मिठाच्या द्रावणात भिजवून त्यापासून गोड लोणचे विनेगर मध्ये बुडवून बाटलीबंद करण्याचा व्यवसाय देखील केला जातो.
अशा पद्धतीने तुम्ही कांदा निर्जलीकरण करून जर त्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार करून विक्री केली तर नक्कीच या माध्यमातून तुम्ही चांगला पैसा मिळवू शकता.