Animal Care In Summer: उन्हाळा सुरू होण्याची आहे ही वेळ! जनावरांना वाढत्या उष्णतेमुळे होऊ शकतात ‘हे’ त्रास, अशी घ्या काळजी

Ajay Patil
Published:
animal care in summer

Animal Care In Summer:- सध्या फेब्रुवारी महिना सुरू असून तापमान वाढल्याची सध्या स्थिती दिसून येत आहे. थंडीचे प्रमाण संपूर्ण राज्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी आता कमी झाले असून तापमान वाढताना दिसून येत आहे व उन्हाळ्याची चाहूल लागली अशी सध्या स्थिती आहे.

त्यामुळे साहजिकच उन्हाळ्यामध्ये पशुपालक शेतकऱ्यांची देखील काही प्रमाणात चिंता वाढते. कारण वाढत्या तापमानामध्ये जनावरांच्या बाबतीत देखील अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे विशेष काळजी घ्यावी लागते.

उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये वाढत्या तापमानात जर जनावरांचे योग्य व्यवस्थापन केले नाही तर जनावरांना अनेक प्रकारचे आरोग्य विषयक समस्या उद्भवतात व कधीकधी जनावर दगावू देखील शकतात. त्यामुळे पशुपालकांनी उन्हाळ्याच्या कालावधीत जनावरांची व्यवस्थित काळजी घेणे खूप गरजेचे असते.

या लेखामध्ये आपण वाढत्या तापमानामुळे जनावरांना कुठला त्रास होऊ शकतो व त्याकरिता कुठली काळजी घ्यावी? याबाबतची माहिती बघणार आहोत.

 उन्हाळ्यात जनावरांना होऊ शकतात आरोग्य विषयक समस्या

1- विषबाधा होण्याची शक्यता- उन्हाळ्यामध्ये जास्त करून चाऱ्याचा विचार केला तर हिरवा चाऱ्याची कमतरता दिसून येते. त्यामुळे जनावरे मिळेल ते हिरवे वनस्पती खाण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचदा अशामुळे घाणेरी किंवा धोतरासारखी विषारी वनस्पती जनावरांकडून खाल्या जातात व त्यामुळे त्यांना विषबाधा होण्याची शक्यता वाढते.

जर अशा प्रकारच्या वनस्पती खाल्ल्याने विषबाधा झाली तर जनावरे काही खात नाहीत किंवा खाली बसतात. उठत नाही तसेच पाय सोडून ताबडतोब दगावण्याची शक्यता देखील असते. त्यामुळे अशी परिस्थिती दिसून आली असता ताबडतोब  पशुतज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

2- उष्माघात होऊ शकतो- उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा प्रखर सूर्यकिरणांमुळे आणि पिण्याच्या पाण्याची कमतरता झाली तर उष्माघात होण्याची शक्यता वाढते. यामध्ये शरीराची कातडी कोरडी पडते तसेच जनावरे अतिशय थकल्यासारखे होतात व भूक देखील मंदावते.

दूध देणारी जनावरे असतील तर दूध देण्याचे प्रमाण कमी होते. जर जनावरांना असा प्रकार दिसून आला तर तात्काळ त्यांच्या अंगावर थंड पाणी ओतावे व त्यासोबतच ओला कापड किंवा गोणपाट ओले करून जनावरांच्या डोक्यावर ठेवणे गरजेचे असते.

तसेच जनावराच्या अंगावर वारंवार पाणी शिंपडावे. उष्माघात झालेल्या जनावराला भरपूर प्रमाणात स्वच्छ आणि थंड पाणी प्यायला द्यावे व चारा खायला घालावा.

3- कडव्या हा कातडीचा आजार होऊ शकतो- तीव्र स्वरूपाचे प्रखर सूर्यप्रकाशामुळे जनावरांच्या कातडीला हा आजार होऊ शकतो. जे जनावरांचे कातडी पांढरा रंगाची असते त्यांना हा आजार होण्याची शक्यता वाढते. जेव्हा प्रामुख्याने चाऱ्याची कमतरता असते

व भूक लागल्यावर जनावर गाजर म्हणजेच काँग्रेस गवत खाते व सूर्यप्रकाशात अधिक वेळ राहिले तर हा आजार होतो. जर कडव्या आजाराची लक्षणे दिसली तर जनावरांना सावलीत बांधावे व भरपूर प्रमाणात थंड पाणी प्यायला द्यावे. ताबडतोब पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनाने उपचार घ्यावेत.

4- कॅल्शियम कमी होऊ शकते- बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये हिरवा चाऱ्याची कमतरता असते व अशावेळी जनावरांना ऊसाची वाढे खायला दिले जातात

हे खाल्ल्यामुळे उसाच्या वाड्यामध्ये असलेली ऑक्सिलेट खनिज आणि जनावरांच्या शरीरातील कॅल्शियम एकत्र येते व लघवी वाटे निघून जाते. त्यामुळे जनावरांच्या शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी होते.

मिल्क फीवर नावाचा आजार जनावरांना होण्याची शक्यता वाढते. यामध्ये जनावरे थकतात व शरीराचे तापमान अतिशय कमी होते.

जनावरे रवंथ करणे बंद करतात. काहीही खात नाही तसेच दूध देणे देखील कमी होते. जनावरे मान टाकून खाली बसतात. हा प्रकार दिसून आल्यास तातडीने पशुवैद्यकांकडून उपचार करावेत.

 उन्हाळ्यामध्ये असे करावे व्यवस्थापन

1- उन्हाळ्याच्या कालावधीत जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित ठेवण्याकरिता स्वच्छ व थंड पाणी भरपूर प्रमाणामध्ये प्यायला द्यावे.

2- जनावरांना पाणी पाजताना ते एका दिवसातून एक ते दोन वेळ न देता दिवसातून चार ते पाच वेळा पाणी पाजावे.

3- दुपारची वेळ असेल तेव्हा जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे किंवा ओले कापड किंवा गोणपाट जनावरांच्या डोक्यावर ठेवावे व वारंवार पाणी मारत राहावे.

4- शक्य असेल तर गोठ्यामध्ये फॉगरचा वापर करावा.

5- गोठ्याची छपरावर नारळाच्या झावड्या किंवा भाताचा पेंढा किंवा गवत टाकावे.

6- वारा वाहण्याची जी दिशा असेल त्या दिशेने गोठ्याच्या बाजूला पाण्यात भिजवलेले बारदान बांधून घ्यावे व दिवसातून तीन ते चार वेळेस ते पाणी शिंपडून ओले करावे.

7- दुपारच्या वेळी जनावरांना बाहेर चरायला न नेता शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी न्यावे.

8- चाऱ्याचे नियोजन करताना एका दिवसात लागणारा चारा एकाच वेळी न देता तो तीन ते चार वेळा द्यावा. चाऱ्याची बारीक कुट्टी करून दिली तर खूप फायदा होतो. तसेच वाळलेले गवत तसेच कळबा असेल तर त्यावर मिठ किंवा गुळाचे पाणी शिंपडून मग जनावरांना खायला द्यावे.

9- उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची कमतरता जाणवते. अशावेळी हरभरा तसेच भुईमुगाची टरफले  गव्हाचा भुसा आणि ऊस वाड्यांचा गरज पाहून वापर करावा.

10- उन्हाळ्याच्या कालावधीत जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची शक्यता असते म्हणून पशु तज्ञांकडून घटसर्प तसेच फऱ्या आणि लाळ्या खुरकूत सारख्या आजारांचे नियंत्रणाकरिता लसीकरण करून घ्यावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe