Fish Farming:- सध्या आपण अनेक व्यवसाय किंवा कृषी क्षेत्रातील अनेक तरुणांच्या यशोगाथा अनेक माध्यमातून ऐकतो किंवा वाचतो. यामध्ये बऱ्याच तरुणांनी चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायांमध्ये उडी घेतली आणि मोठ्या कष्टाच्या जोरावर व्यवसाय यशाच्या शिखरावर पोहोचवले.
नोकरीमध्ये जितके आर्थिक उत्पन्न मिळेल त्यापेक्षा दुप्पट तिपटीने पैसा हे तरुण कमावत आहेत. नोकरी सोडून एखादा व्यवसाय करणे म्हणजे खूप मोठी जोखीम आहे हे मात्र निश्चित. परंतु मनात असलेली जिद्द आणि ध्येय खूप महत्त्वाचे असते व ध्येय गाठण्यासाठी लागणारे प्रयत्न व सातत्य आणि कठोर मेहनत घेण्याची तयारी या गुणांमुळे असे तरुण यशस्वी ठरतात.
याच मुद्द्याला धरून जर आपण वैशाली जिल्ह्यातील कन्होली या गावच्या अभिषेक कुमार या तरुणाचा विचार केला तर या तरुणाने नोकरी सोडून मत्स्य व्यवसाय सुरू केला व या माध्यमातून तो आता चांगल्या प्रकारचे आर्थिक उत्पन्न मिळवत आहे.
नोकरी सोडून सुरू केले मत्स्यपालन
याबाबत सविस्तर वृत्त असे की वैशाली जिल्ह्यातील कन्होली या गावचा अभिषेक कुमार याची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर त्यांनी नॅचरल सायन्समध्ये बीएससी केले असून तो भारत सरकारच्या शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीला होता व या ठिकाणी त्याने दोन वर्षे नोकरी केली.
परंतु या ठिकाणी खूप व्यस्त शेडूल असल्यामुळे कंटाळला होता व त्याने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. नंतर काय करावे या विचारात असताना त्यांनी मत्स्यपालन करण्याचे ठरवले. त्यामुळे या व्यवसायाची अधिकची माहिती मिळावी म्हणून इंटरनेटची मदत घेतली व त्या माध्यमातून इंडोनेशिया, थायलंड, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये कोणत्या प्रकारचे मत्स्यपालनाचे तंत्र वापरले जाते हे त्याने जाणून घेतले
व मत्स्यपालन व्यवसाय सुरू करण्याचे प्लॅनिंग केली. त्यानंतर अभिषेकने मोतीपुर मत्स्य संशोधन प्रशिक्षण केंद्रातून यासंबंधीच्या आवश्यक ट्रेनिंग घेतले आणि त्यानंतर चार सिमेंट टाक्या बांधल्यावर मत्स्य पालन व्यवसायाला सुरुवात केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याने व्यवसायामध्ये वाढ केली.
तो सध्या कटला तसेच रोहू यासारख्या अनेक माशांच्या प्रजातींचे संगोपन करत आहे. जेव्हा अभिषेक शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये काम करत होता तेव्हाच त्याला मत्स्य व्यवसायाची कल्पना सुचल्याचे देखील त्याने म्हटले.
चार टाक्यांमधून वर्षाला कमवत आहे दहा लाख रुपये
मत्स्य पालन व्यवसायाचे ट्रेनिंग घेतल्यानंतर अभिषेक ने चार टाक्या बांधल्या व त्यामध्ये मत्स्य पालन सुरू केले. हा साधारणपणे त्याच्या व्यवसायाला चार वर्षे पूर्ण झालेली आहेत व या चार वर्षांमध्ये त्याने या संबंधीचे सर्व तंत्रज्ञान आत्मसात केलेली आहे. अभिषेक कुमार या चार टाक्यांमधून मत्स्य पालन करतो व वर्षाला दहा लाख रुपयांचा नफा कमवतो.
अशा पद्धतीने अभिषेक कुमार याचे उदाहरणावरून दिसून येते की जर माणसाच्या मनामध्ये काही वेगळे करण्याची इच्छा असेल व ती इच्छा पूर्ण करण्यासाठी लागणारे सातत्य व कष्ट करण्याची तयारी असेल तर व्यक्ती यशस्वी होऊ शकतो.