EV Charging Tips:- सध्या हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढताना दिसून येत आहे. इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक बाइक तसेच अनेक कंपन्यांच्या माध्यमातून आता इलेक्ट्रिक कारची देखील निर्मिती करण्यात येत असून वाढते पेट्रोल आणि डिझेल किमतीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढत आहे.
तसेच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील इलेक्ट्रिक वाहनांचा वापर हा फायद्याचा असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकरिता प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सर्वात जास्त प्रमाणात होईल हे मात्र निश्चित.
परंतु या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराबाबत काही गोष्टींची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. यामध्ये या वाहनांना चार्जिंग करताना विशेष करून काही गोष्टींकडे लक्ष पुरवणे महत्त्वाचे आहे.
इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर धावण्यासाठी आपल्याला त्यांना चार्ज करणे गरजेचे असते व चार्जिंग करताना योग्य पद्धतीने चार्ज करणे देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे या लेखात आपण इलेक्ट्रिक वाहने चार्ज करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी? याबद्दलची माहिती घेऊ.
इलेक्ट्रिक वाहने चार्ज करताना या गोष्टींची काळजी घ्या
1- बॅटरी जास्त चार्ज करू नये– बऱ्याचदा आपण साधारणपणे मोबाईल जरी चार्जिंगला लावतो तरीदेखील तो 100% चार्ज करतो. मुळात ही सवयच आपल्याला लागलेली असते. परंतु जर असे केले तर मात्र वाहनांमधील बॅटरी खराब होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी कधीही 100% चार्ज करू नये.
वाहनांच्या बॅटरीमध्ये वापरण्यात येणारे लिथियम आयन हे 30 ते 80 टक्के चार्जिंग केल्यावर देखील उत्तम पद्धतीने काम करते. त्यामुळे सातत्याने बॅटरी 100% चार्ज केली तर त्यावर ताण येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहने 80% पर्यंत चार्ज करणे फायद्याचे ठरते.
2- बॅटरी संपूर्णपणे उतरु(ड्रेन)देऊ नये– तसेच बऱ्याचदा आपण गाडीची बॅटरी किती राहिली आहे किंवा त्यामध्ये किती चार्जिंग शिल्लक आहे हे पाहत नाही व बऱ्याचदा बॅटरी 0% पर्यंत येते. म्हणजेच ती ड्रेन होते.
यामुळे देखील बॅटरी खराब होऊ शकते. त्यामुळे जेव्हा वाहन 20 टक्क्यांच्या जवळपास असेल तेव्हा ते चार्ज करणे फायद्याचे ठरते. परंतु बॅटरी शून्यावर आली तर तिला शून्यापासून चार्ज होण्यासाठी खूप वेळ लागतो व बॅटरीवर ताण येऊ शकतो.
3- वाहन चालवून आल्यानंतर लगेच चार्जिंग करू नये– जेव्हा वाहन आपण चालवून आणतो तेव्हा बॅटरी लिथियम आयन बॅटरीज मोटरला पावर देताना मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण करते व त्यामुळे वाहन चालवून आणल्यानंतर लगेच चार्जिंग करणे धोक्याचे ठरू शकते.
तसेच असे केल्याने वाहनांमध्ये थर्मल प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. याकरिता वाहन चालवून आणल्यानंतर साधारणपणे ते थंड झाल्यानंतर किंवा अर्धा एक तासांनी चार्जिंगला लावावे.
4- सतत चार्जिंग करू नये– तसेच आपण वाहन थोडे फिरवून आणले तरी चार्जिंग लावतो. परंतु असे केल्याने देखील बॅटरी खराब होण्याची शक्यता वाढते. एवढेच नाही तर सातत्याने परत परत चार्जिंग लावत राहिल्याने त्याचा विपरीत परिणाम बॅटरीच्या कार्यक्षमतेवर देखील होण्याची शक्यता असते. त्यामुळे गरज असेल तेव्हाच बॅटरी चार्ज करावी हे लक्षात ठेवावे.