Scholarship For Girls:- शिक्षणाच्या दृष्टिकोनातून मुलींना प्रोत्साहन मिळावे तसेच ग्रामीण भागातील मुलींची ग्रामीण भागामध्ये जी काही शाळेत गळती बघायला मिळते ती थांबावी याकरिता सरकारच्या माध्यमातून गेल्या कित्येक दिवसापासून अनेक प्रकारचे प्रयत्न करण्यात येत आहे.
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून या प्रयत्नांना खूप महत्त्व असून मुलींच्या भविष्यासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी शिक्षण महत्त्वाचे असल्याने मुलींसाठी अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि इतर योजना सरकारच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत. जर आपण ग्रामीण भागाचा किंवा शहरी भागाचा विचार केला तर राज्यामध्ये इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत मुलींच्या शिक्षणातील गळतीचे प्रमाण जास्त आहे.
ही गळती थांबावी याकरिता प्राथमिक शाळा व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये शिकत असलेल्या विमुक्त जाती तसेच भटक्या जमातीतील आणि विशेष मागासवर्ग प्रवर्गातील मुलींकरिता सरकारच्या माध्यमातून ‘सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना’ लागू करण्यात आलेली असून ही योजना खूप महत्त्वाची आहे.
‘सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना’ मुलीच्या शिक्षणासाठी आहे महत्त्वाची
राज्यामध्ये असलेल्या प्राथमिक शाळा व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये शिकत असलेल्या भटक्या जमाती तसेच विमुक्त जाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्या मुलींकरिता सरकारच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आलेली असून ही योजना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून राबवली जात आहे.
इयत्ता पाचवी व सातवी साठी साधारणपणे 1996 तर आठवी ते दहावी करिता 2003 पासून ही योजना लागू करण्यात आलेली आहे. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी गुण किंवा उत्पन्न यांची अट नाही. मुलींना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ वर्षातून तीन टप्प्यात देण्यात येतो.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत किती मिळतो लाभ?
योजनेच्या माध्यमातून इयत्ता पाचवी ते सातवी मधील इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थिनींना प्रत्येक महिन्याला 250 रुपये प्रमाणे दहा महिन्यांकरिता अडीच हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळते.
तर इतर मागास प्रवर्गातीलच इयत्ता आठवी ते दहावी मधील विद्यार्थिनींना प्रत्येक महिन्याला 300 याप्रमाणे दहा महिन्यांकरिता 3000 रुपयांची शिष्यवृत्ती मिळते. या योजनेच्या शिष्यवृत्तीचे दर अजून पर्यंत कमी असल्यामुळे दरांमध्ये वाढ करण्याचा शासनाच्या माध्यमातून विचार सुरू आहे.
या योजनेची अधिक माहिती कुठे मिळेल?
तुम्हाला देखील या योजनेची अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी(वर्ग-2) व संबंधित विद्यालयाचे मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधणे गरजेचे आहे.