थोडंसं मनातलं : लाॅकडाऊन असुनही मोबाईल मुळे “अबोल” झालीत “कुटुंब”…..

Ahmednagarlive24
Published:

नमस्कार मित्रांनो
सध्या देशात कोरोनाची साथ पसरली आहे. कोरोना प्रदुर्भाव टाळण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. तसेच 25 मार्च पासुन 31जूलै 2020 पर्यंत टप्पा पध्दतीने लाॅकडाऊन जाहीर केला आहे. या लाॅकडाऊन च्या काळात पहिल्या तीन टप्प्यांत जवळपास सर्व उद्योग व्यवसाय बंद असल्याने अर्थिक घडी विस्कळीत झाली होती. त्यामुळे कुटुंबातील जवळपास सर्व माणसं घरीच आहेत. खरं तर या लाॅकडाऊन च्या काळात समाजात अनेक प्रश्न निर्माण झालेत. कुटुंबातील सदस्य एकत्रित घरात असताना त्यांच्यामध्ये सुसंवाद होणे अपेक्षित असते. परंतु अनेक ठिकाणी त्याचे दुष्परिणाम पहायला मिळाले.

विज्ञान हे शाप की वरदान असा निबंध पुर्वी शाळेत परीक्षा साठी हमखास यायचा. तेव्हा उत्तर एकच असायचे की, जर चांगला वापर केला तर वरदान आणि गैरवापर केला तर शाप. आज तशीच परिस्थिती घराघरात पहायला मिळते. कुटुंबातील सदस्य एकत्रित घरात असताना सुद्धा केवळ मोबाईल च्या अतिवापरामुळे सुसंवाद तर सोडाच पण कधी कधी साधे बोलणे ही होत नाही किंवा एकमेकांची विचारपुस पण नाही. त्यामुळे नातीगोती अबोल झाली की काय असा प्रश्न पडतो. खरंच माणसा पेक्षा मोबाईल इतका महत्वाचे वाटतात का हा सुद्धा एक अनुत्तरीत प्रश्न आहे.

खरं तर या कोरोना ने जगाची परीक्षाच पाहीली आहे. लाॅकडाऊन च्या काळात सर्व प्रवास बंद असल्याने कोणाला कुठे ही ये जा करणे अशक्य झाले होते. त्यामुळे अनेक लोकांनी आपल्या कुटुंबाबरोबर रहायचे ठरवले होते. कुटुंबातील अनेक सदस्य नोकरी, शिक्षण आणि व्यवसाया निमित्ताने आपले गाव सोडून बाहेरच्या शहरात असतात.

लाॅकडाऊन मुळे सर्व व्यवहार बंद असल्याने सर्वजण आपापल्या घरी गेले आहेत. दोन महिने झाले लाॅकडाऊन आहे. या काळात अनेक दुर्दैवी घटना पण घडल्या आहेत. काल परवा बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीने आपल्याच दोन मुलासह पत्नीची हत्या केली तर जामखेड मध्ये शेतीच्या वादातून एका तरूणाचा बळी गेला. काही लोकांना आपल्या जवळच्या नातेवाईकांचे सुखदुःखात सहभागी होता आले नाही तर अगदी पतीच्या अंतयात्रेत पत्नी ला सहभागी होता आले नाही. मुलाच्या निधनाबद्दल माहिती मिळूनही अंतयात्रेत आईला किंवा वडील यांना सहभागी होता आले नाही. या लाॅकडाऊन मुळे खुप काही शिकायला मिळाले आहे.

खरं तर कुटुंब सुखी असेल तर सर्व जग सुखी आहे अशी एक म्हण लहानपणी ऐकली होती. परंतु कुटुंबातील सदस्य एकत्रित आले असताना चांगले काही घडायचे ऐवजी बेबनाव जास्त दिसत आहे. अनेकदा आपला” ईगो ” पुढे येतो. त्यामुळे अनेक महिलांनी कौटुंबिक हिंसाचारचे बाबतीत पोलिस कडे तक्रार केल्या बाबतीत वर्तमानपत्रात वाचून समजले. यातुन एकच निष्कर्ष निघतो की, प्रत्येकाला स्वातंत्र्य व स्वतंत्र जीवन जगण्याची इच्छा आहे. घरातील मोठी माणसं केव्हाच “डस्टबीन ” झाले आहेत. त्यांचं काही सांगणं म्हणजे अटी शर्ती वाटतात.

घरातील प्रत्येक सदस्याजवळ मोबाईल फोन आहेच. त्यामुळे तो घरातील लहान थोर सदस्यां बरोबर बोलण्या ऐवजी मोबाईल वर जास्त असतो. त्याचे दुष्परिणाम पण होतात याची जाणीव ठेवली जात नाही. अशीच जर नातीगोती अबोल झाली तर कुटुंब व्यवस्था कोलमडली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून या लाॅकडाऊन च्या काळात तरी कुटुंबातील सदस्यांनी एकत्रित येऊन एकमेकांना समजून घेतले पाहिजे. तसेच घरातील जेष्ठ सदस्यांना तिरस्काराची वागणूक देऊ नये. ते जे करतात ते कुटुंबातील सदस्य सुखी रहावे म्हणूनच करतात याची जाणीव ठेवली पाहिजे. “चला नाती जपवूया ” या विषयावर सोलापूर येथील समाजसेविका स्व. अपर्णाताई रामतिर्थकर नेहमीच मार्गदर्शन करत होत्या. तसेच आता कुटुंब व्यवस्था टिकावी म्हणून ” पुरूष हक्क समिती ” काम करत आहेत.

आपसात असणारे गैरसमज दूर करण्यासाठी लाॅकडाऊन ही चांगली संधी आहे असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. अनेकदा केवळ गैरसमजातून दुरावा वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे एकमेकांना समजून घेतले पाहिजे. झाल्या असतील काही चूका तर मोठ्या मनाने माफ करुन पुन्हा कुटुंब व्यवस्था भक्कम होईल याची काळजी घेतली तर निश्चितच एक चांगला मेसेज समाजात जाईल. केवळ मोबाईल च्या अतिवापरा मुळे कुटुंब व्यवस्था तुटणार नाही याची काळजी घ्यावी.

कदाचित चार पाच दिवसानंतर लाॅकडाऊन संपल्यावर पुन्हा सर्वजण आपापल्या कुटुंबापासून पुन्हा बाहेर जातील. तेव्हा फक्त मोबाईल हे एकच साधन असेल एकमेकांना बोलण्यासाठी. त्यामुळे आता कुटूबात आहात तर आनंदी रहा. कोरोना नावाचा व्हायरस संपूर्ण देशभर थैमान घालतोय आणि त्याची धग देशातील सर्व राज्यात पसरली आहे. आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील संख्या कमी अधीक होत आहे.

परंतु प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांनी चांगली भूमिका घेतली आहे. आपण सुरक्षित रहावे म्हणून पोलिस प्रशासन, लोकप्रतिनिधी, सफाई कर्मचारी, महापालिका प्रशासन, सामाजिक संस्था आणि समाजसेवक, पत्रकार मंडळी, शिक्षक मंडळी, आशा सेविका हे सगळे आपले प्राण वाचविण्यासाठी काम करत आहेत याची जाणीव नागरिकांनी ठेवावी. मग आपण तर फक्त आपले कुटुंब वाचवण्यासाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे.

कोरोनाचा प्रदुर्भाव टाळण्यासाठी आपण आपली व परिवाराची काळजी घ्यावी हि विनंती आहे. प्रशासनाचे सूचनांचे पालन केले पाहिजे. तसेच जमावबंदीचे आदेश दिले आहेत त्याचे सुद्धा पालन करावे ही नम्र विनंती. सध्या कोरोना अहमदनगर शहरात घुसण्याचा प्रयत्न करतच आहे. परंतु नागरिकांनी नियमाचे काटेकोर पालन केले तर आपण निश्चितच कोरोना वर मात करू शकतो यात शंकाच नाही.
त्यामुळे नागरिक हो कुटुंबातील व्यक्ती बरोबर सुसंवाद करा, जेष्ठ सदस्यांना समजून घ्या, महिलांनी कायद्याचा वापर ढाल म्हणून करावा, तलवार म्हणून करू नका, घरीच रहा सुरक्षित रहा. प्रशासन आणि नागरिकांनी मिळून ही लढाई लढणे गरजेचे आहे.
प्रशासन आपल्या सोबत आहे.

ॲड शिवाजी अण्णा कराळे
सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर
99 22 545 545

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment