आपण जे पैसे कमवतो व त्या पैशांची गुंतवणूक करत असतो तेव्हा त्या गुंतवणुकीमध्ये आपले साधारणपणे दोन उद्दिष्ट असतात. त्यातील पहिले आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण जी गुंतवणूक करत आहोत ती सुरक्षित रहावी आणि दुसरे म्हणजे केलेल्या गुंतवणुकीतून आपल्याला रिफंड म्हणजेच परतावा हा चांगला मिळणे हे होय. या पद्धतीनेच गुंतवणूक पर्यायांची निवड केली जाते.
गुंतवणुकीसाठी प्रामुख्याने जोखीम मुक्त गुंतवणूक करायचे असेल तर बँकांच्या मुदत ठेव योजना व पोस्ट ऑफिसच्या योजना या गुंतवणूकदारांकडून जास्त पसंती दिल्या जाणाऱ्या योजना आहेत. परंतु बँकांचे व्याजदर आणि पोस्ट ऑफिसचे व्याजदर हे वेगवेगळे असल्याने ज्या ठिकाणी आपल्याला गुंतवणूक केल्यावर चांगला परतावा मिळेल अशा ठिकाणी गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.
या दृष्टिकोनातून जर आपण पोस्ट ऑफिसच्या योजना पाहिल्या तर या बऱ्याचदा आपल्याला बँकांच्या योजनांपेक्षा सरस असल्याचे दिसून येते. यापैकीच आपण योजना पाहिली तर पोस्ट ऑफिसची नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजना एक महत्वाची योजना असून बँकांपेक्षा या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना जास्त परतावा मिळत आहे. त्यामुळे या योजनेचे स्वरूप आपण या लेखात बघू.
पोस्टाची नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम आहे उत्तम
पोस्ट ऑफिसची नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजनाही गुंतवणुकीच्या दृष्टीने सुरक्षित आहेच. परंतु देशातील ज्या काही मोठ्या बँक आहेत त्यापेक्षा ग्राहकांना जास्त परतावा देण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. या योजनेच्या माध्यमातून जो काही व्याजदर आहे तो केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून प्रत्येक तीन महिन्यांनी सुधारित केला जातो.
या पद्धतीने अर्थ मंत्रालयाच्या माध्यमातून जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याकरिता नवीन व्याजदर जाहीर करण्यात आलेले आहेत व ते एक जुलैपासून लागू होणार असून 30 सप्टेंबर पर्यंत लागू राहणार आहे. सध्या पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजनेवर 7.7% इतकं व्याज मिळत आहे व हा व्याजदर इतर बँकापेक्षा जास्त आहे.
तुम्हाला जर या योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर 18 वर्षावरील कोणतेही भारतीय व्यक्ती यामध्ये खाते उघडू शकतो. दहा वर्षावरील मुलांना खाते उघडायचे असेल तर त्या मुलांच्या नावाने त्यांचे पालक खाते उघडू शकतात व या योजनेत पाच वर्षांकरिता पैसे जमा केले जातात. यामध्ये कमीत कमी एक हजार रुपयांपासून तुम्ही गुंतवणूक करू शकतात व शंभर रुपयांच्या पटीमध्ये कितीही रक्कम तुम्हाला यामध्ये जमा करता येते.
म्हणजेच जास्तीत जास्त तुम्ही कितीही रक्कम जमा केली तरी चालते म्हणजे यावर कुठलीही मर्यादा नसते. ही योजना तुम्ही ठेव ठेवल्याच्या तारखेपासून पाच वर्षे पूर्ण झाले की परिपक्व म्हणजेच मॅच्युअर होते. जर आपण स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँकेचा पाच वर्षात परिपक्व होणाऱ्या एफडी चा व्याजदर पाहिला तर तो पोस्टाच्या या योजनेत मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा कमी आहे.
सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया पाच वर्षाच्या मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांना 6.60% परतावा देत आहे तर ज्येष्ठ नागरिकांना 7.50% व्याजदर देत आहे. त्यासोबतच एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून पाच वर्षाच्या कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना सात टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.50% इतका परतावा देत आहे.
यासोबतच आयसीआयसीआय बँक सामान्य नागरिकांना पाच वर्षाकरिता 6.90% तर जेष्ठ नागरिकांसाठी 7.40% व्याज देत आहे.यावरून आपल्याला दिसून येते की पोस्ट ऑफिसची नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजनेत गुंतवणूक म्हणजेच पाच वर्षाकरिता एफडी केली तर तुम्ही 7.7% व्याजाचा लाभ मिळवून बँकांपेक्षा अधिकचा परतावा मिळवू शकतात.