Ashadi Ekadashi 2024:- उद्या आषाढी एकादशी असून महाराष्ट्रातून वारकऱ्यांचा मेळा पंढरपुरात दाखल झालेला आहे. महाराष्ट्राला अलौकिक अशी वारकरी संप्रदायाची परंपरा लाभली असून वारकरी संप्रदायाचे प्रमुख दैवत हे पंढरपूरचे विठ्ठल रखुमाई हे आहेत. तसे पाहायला गेले तर वारकरी संप्रदायच नाही तर अखंड महाराष्ट्राचे दैवत म्हणून पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाईला ओळखले जाते.
पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरासाठी पंढरपूर संपूर्ण भारतात नाही तर जगात प्रसिद्ध आहे.परंतु तुम्हाला माहित आहे का की पंढरपूर व्यतिरिक्त उत्तराखंडमध्ये असलेल्या माणा या गावी देखील विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे व या मंदिराला खास अशी वैशिष्ट्य आहेत. याच मंदिराची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
देशाच्या प्रथमस्थानी असलेले माणा गावात आहे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर
माणा गाव उत्तराखंड राज्यामध्ये असून ते सांस्कृतिक वारसासाठी व इतर अनेक कारणांसाठी खूप प्रसिद्ध आहे. माना गावामध्ये रांडापा जातीचे लोक राहतात. या गावाचे आणखीन एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे देशाच्या प्रथमस्थानी असलेले गाव असून बद्रीनाथ पासून अगदी जवळच्या अंतरावर आहे. या गावांमध्ये तुम्हाला भगवान शंकराची उपासना करणारे अनेक भक्त पाहायला मिळतात.
या गावाचे अनेक वैशिष्ट्य असून एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महत्त्वाच्या अशा सरस्वती नदीचा उगम देखील या गावातून झाला आहे व याच गावात विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर देखील आहे. माणा हे गाव एकोणवीस हजार फूट उंचीवर असून मनीभद्र देव यांच्या नावावरून या गावाचे नाव माणा असे पडल्याचे सांगण्यात येते.
तसेच जर आपण पौराणिक संदर्भ घेतला तर त्यानुसार भारतामधील हे असे एकमेव गाव आहे जे पृथ्वीवर असलेल्या चार धामांपैकी सर्वात पवित्र मानले जाते. या गावाचा परिसर बर्फाच्छादित असल्याने या ठिकाणी कायमच अतिशय कडाक्याची थंडी असते. या ठिकाणचा बरासा भाग सहा महिने बर्फाने झाकलेला दिसून येतो.
जेव्हा हिवाळा सुरू होतो त्याआधी या ठिकाणी राहणारे रहिवासी चमोली जिल्ह्यामध्ये असलेल्या खालच्या गावात राहायला येतात. या गावाचे एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी एक इंटर कॉलेज आहे व ते सहा महिने माणा या ठिकाणी चालवले जाते तर सहा महिने चमोलीत चालते.
माणा गावाला आहे धार्मिक अधिष्ठान
या गावांमध्ये सरस्वती नदीचा उगम होतो व या नदीच्या काठावर सरस्वतीचे एक मोठे मंदिर बांधण्यात आलेले आहे व या मंदिरामध्ये विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर तसेच संत तुकाराम यांच्या आकर्षक व सुंदर अशा मूर्ती देखील आहेत. पुण्यातील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या संकल्पनेतून या मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे.
जर या गावाला भेट दिली तर तुम्हाला अनेक नैसर्गिक सौंदर्यस्थळे देखील पाहायला मिळतात. माणा या गावी तुम्हाला अलकनंदा आणि सरस्वती या दोन नद्यांचा मनोहर संगम देखील पाहायला मिळतो.
या ठिकाणी तुम्हाला अनेक प्राचीन मंदिरे व गुहा पाहायला मिळतात. या ठिकाणी प्रचंड प्रमाणात लोकांची गर्दी होत असते. समुद्रसपाटीपासून 18 ते 19 हजार फूट उंचीवर असल्यामुळे त्या ठिकाणाहून दऱ्याखोरांच्या सौंदर्य पाहण्यामध्ये वेगळीच मजा असते.