Soybean Market Update:- मागच्या वर्षी आपण बघितले की सोयाबीनने शेतकऱ्यांचा पुरता अपेक्षाभंग केला. संपूर्ण हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन भाववाढीचे प्रतीक्षा केली परंतु शेतकऱ्यांना मात्र अपेक्षित दरवाढ काही मिळाली नाही व त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक दृष्टिकोनातून खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आता यावर्षी देखील सोयाबीन हंगाम सुरू झाला असून नवीन सोयाबीन आता बाजारपेठेत येऊ लागले आहे.
परंतु जर बाजारातील दरांचा विचार केला तर सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या हमीभावापेक्षा देखील हे दर कमी मिळताना दिसून येत आहे.
सध्या बाजारामध्ये जे काही नवीन सोयाबीन विक्रीला येत आहे त्याला चार हजारापासून ते साडेचार हजार रुपयेपर्यंत दर मिळत आहेत व हे बाजार भाव हमीभावापेक्षा देखील कमी आहेत.
त्यामुळे आता येणाऱ्या कालावधीत सोयाबीनच्या दरात वाढ होईल की नाही? हा सगळ्यात मोठा प्रश्न सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पुढे आहे. एकंदरीत आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत परिस्थिती बघितली तर यावर्षी देखील सोयाबीनचे बाजार भाव अपेक्षित प्रमाणात वाढतील अशी चिन्हे नाहीत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सोयाबीन उत्पादन वाढण्याचा अंदाज?
आंतरराष्ट्रीय पातळीवरील सोयाबीन उत्पादनाचा विचार केला तर यावर्षी अर्जंटीना तसेच चीन,अमेरिका व ब्राझील सारख्या देशांमध्ये सोयाबीन उत्पादन वाढण्याचा एकंदरीत अंदाज असून भारतामध्ये देखील सोयाबीन उत्पादन वाढेल असा एक अंदाज आहे. साहजिकच उत्पादन वाढल्यामुळे जागतिक पातळीवर सोयाबीनचा पुरवठा देखील वाढेल.
या अंदाजामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीन आणि सोयापेंड या दोन्हींचे भाव दबावत असल्याचे दिसून येत आहे.अमेरिकेमधील सोयाबीन आता बाजारात येऊ लागले आहे तर ब्राझील आणि अर्जेंटिना या ठिकाणी सोयाबीनची पेरणी आता सुरू होणार आहे.
तसेच वातावरणीय दृष्टिकोनातून बघितले तर यावर्षी त्या ठिकाणी ला निना परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे व ही परिस्थिती नेमकी कधी येणार? याबाबत अनेक अंदाज वर्तवण्यात येत आहे. ला निना असताना ब्राझील आणि अर्जेंटिनात कमी पाऊस पडू शकतो किंवा पावसातील खंड, दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
परंतु अद्याप पर्यंत मात्र ला निना कधी येणार किंवा त्याची तीव्रता कधी वाढणार? या सगळ्या ला निना परिस्थितीचा ब्राझील आणि अर्जंटीनातील पिकांवर परिणाम होणार का? याबद्दल कुठलीही निश्चितता नाही व हे सगळ्या गोष्टी पुढच्या काळातच समजतील.
मक्याचा इथेनॉलसाठी होणारा वापर सोयापेंडसाठी ठरत आहे मारक
सोयापेंडचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात दबावत असल्याचे दिसून येत आहे व त्यामुळे भारतीय बाजारपेठेत देखील सोया पेंडचे भाव दबावात आहेत. भारतामध्ये मागील महिन्यापासून सोयापेंडची निर्यात देखील कमी झाली असून उठावदेखील कमी झाला आहे व भाव कमी असूनही उठाव कमी होण्याला काही कारणे देखील आहेत.
त्यामागील प्रमुख कारण जर बघितले तर मागील काही महिन्यांमध्ये इथेनॉल करिता मक्याचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून मक्यातून इथेनॉल काढल्यानंतर जो चुरा किंवा अवशेष शिल्लक राहतो तो स्वस्त मिळत असल्याकारणाने त्याचाच वापर आता पोल्ट्री आणि पशुखाद्य उद्योगांमध्ये केला जात असल्याने आपोआपच सोयापेंडची मागणी कमी होताना दिसून येत आहे व दरावर दबाव आहे.
येणाऱ्या दिवसात सोयाबीनच्या बाजार भावाची स्थिती कशी राहील?
आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारातील परिस्थिती जर बघितली तर यावर्षी देखील सोयाबीनचे बाजारभाव अपेक्षित पातळीपर्यंत पोहोचतील अशी शक्यता कमीच दिसून येत आहे.
येणारे पुढील चार महिन्यात सोयाबीनची आवक बाजारामध्ये वाढेल व त्याचा देखील दरावर दबाव दिसून येईल. त्यामुळे खुल्या बाजारातील बाजार भाव हमीभावाचा टप्पा पार करतील याची देखील शक्यता कमीच आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री हमीभावाने करावी व त्यापेक्षा कमी दरात सोयाबीनची विक्री करू नये असे देखील जाणकारांचे म्हणणे आहे.