Personal Loan:- बरेच व्यक्ती आपत्कालीन आर्थिक परिस्थितीमध्ये पैशांची गरज भागवण्यासाठी कर्जाचा पर्याय निवडतात व याकरिता बँकांकडे पर्सनल लोनसाठी जास्त करून अर्ज केले जातात. तसेच काही व्यक्ती हे क्रेडिट कार्ड करिता बँकेत अर्ज दाखल करतात. परंतु पर्सनल लोन असो किंवा क्रेडिट कार्ड याकरिता केलेला अर्ज बऱ्याचदा परत परत बँकांच्या माध्यमातून रिजेक्ट केला जातो.
म्हणजेच तो अर्ज नाकारला जातो. तेव्हा बऱ्याच जणांना कळत नाही की बँकेकडून केलेला अर्ज का रिजेक्ट केला गेला. यामागे भरपूर कारणे असू शकतात. परंतु काही महत्वाची कारणे यामागे असण्याची शक्यता जास्तीत जास्त असते व तीच कारणे आपण या लेखात बघणार आहोत. जेणेकरून तुम्ही जर पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड करिता अर्ज केला तर बँक तुमचा अर्ज रिजेक्ट करणार नाही.
क्रेडिट कार्ड किंवा पर्सनल लोनसाठी केलेला अर्ज बँकेकडून रिजेक्ट केला जाण्यामागील कारणे
1- क्रेडिट स्कोर- क्रेडिट किंवा सिबिल स्कोर कर्ज घेण्यासाठी आवश्यक असतो हे जवळपास सर्वांना माहिती आहे. जेव्हा ही व्यक्ती पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड साठी अर्ज करते तेव्हा बँक सगळ्यात अगोदर तुमचा क्रेडिट स्कोर तपासत असते.
यामध्ये जर 750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोर असेल तर अशा लोकांना बँक ताबडतोब पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड देते. यामध्ये जास्त क्रेडिट स्कोर असणे म्हणजे संबंधित व्यक्तीचा क्रेडिट इतिहास म्हणजेच व्यवहाराची स्थिती चांगली आहे
व अशा व्यक्तीला कर्ज देण्याचा कमी धोका आहे असा अर्थ या माध्यमातून होतो. परंतु ज्या व्यक्तींचा क्रेडिट स्कोर कमी असतो अशा लोकांना बँक पर्सनल लोन देत नाही. हे सगळ्यात प्रमुख कारण अर्ज रिजेक्ट होण्यामागे असते.
2- कर्जाकरिता परत परत अर्ज करणे- बऱ्याच व्यक्तींना कुठल्याही पद्धतीच्या कर्जाकरिता जास्त किंवा वारंवार अर्ज करण्याची सवय असते किंवा एखाद्या एप्लीकेशन वर जाऊन कर्जाचा शोध घेण्याची एक सवय असते. याप्रमाणे तुम्ही पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डसाठी परत परत अर्ज केले तरी तुमचा क्रेडिट स्कोरवर नकारात्मक परिणाम होतो व तुमचा क्रेडिट स्कोर कमी होतो.
अशावेळी जेव्हा तुम्ही पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड करीता अर्ज करता तेव्हा बँक तुमच्या क्रेडिट रिपोर्ट क्रेडिट ब्युरो कडून मागवते. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीची कर्जासाठीची परत परत चौकशी करत असाल म्हणजेच कठोर चौकशी करत असाल तेव्हा तुमचा क्रेडिट स्कोर काही गुणांनी कमी होतो व या पद्धतीच्या कर्जासाठीच्या चौकशी म्हणजेच कठोर चौकशी तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर नोंदवल्या जातात. त्यामुळे कर्जासाठी वेगळा अर्ज करणे किंवा कर्जाची चौकशी करणे टाळावे.
3- तुमच्यावर अगोदर असलेल्या कर्ज हफ्त्यांचा बोजा- समजा तुम्ही अगोदर काही कर्ज घेतले आहे व त्याचे ईएमआय सुरू आहेत. तर अशावेळी बँक कर्ज देताना अगोदर तुमचे सुरू असलेले कर्जाचे हप्ते म्हणजेच ईएमआय आणि तुमचे उत्पन्न पाहत असते. यामध्ये जर तुमचे चालू असलेले कर्जाचे हप्ते तुमच्या उत्पन्नाच्या 50% ते 55 टक्के असणे गरजेचे आहे.
जर तुमच्या अगोदरच्या कर्ज हप्त्याचा बोजा 50 ते 55% पेक्षा जास्त असेल तर मात्र तुमचा कर्जाचा अर्ज बँक रिजेक्ट करू शकते. त्यामुळे कुठल्याही कर्जाकरिता अर्ज करण्यापूर्वी तुमच्या अगोदरचे कर्जाचे हप्ते किती आहेत व तुमचे उत्पन्न याचे मूल्यांकन करणे खूप गरजेचे आहे.
4- वारंवार नोकरीमध्ये बदल करणे- बऱ्याच जणांना ही सवय असते की एका जागेवर काम करत नाहीत म्हणजेच एक जॉब सोडला की दुसरा जॉब असं सतत चालू असते. परंतु बँकेत तुम्ही जर पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड करीता अर्ज केला तर तुम्ही कुठे काम करतात? तुमची जॉब प्रोफाइल काय आहे आणि तुम्ही किती कालावधीपासून त्या ठिकाणी काम करत आहात?
या सगळ्या बाबींचा विचार बँक करत असते व तेव्हा तुमच्या कर्जाच्या अर्जाचे मूल्यांकन बँक करते. तुमचा जॉब रेकॉर्ड स्थिर किती प्रमाणामध्ये आहे हे बँकांना या माध्यमातून पहायचे असते. तुम्ही जर वारंवार नोकरी बदलत असाल तर मात्र बँक तुम्हाला कर्ज द्यायला टाळाटाळ करू शकते व तुमचा अर्ज रिजेक्ट करू शकते. त्यामुळे वारंवार नोकरी बदलणे टाळावे.