file photo

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 30 लाख रुपये किमतीच्या खाद्य तेलाचा अपहार केलेल्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला नगर शहरातील एकविरा चौकात अटक केली. किशोर मारूती पडदूने (वय 32 रा. बजाजनगर, औरंगाबाद) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, गुजराथ राज्यातील सुरतमधून ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रकमध्ये सोयाबीन खाद्य तेलाचे डबे भरून सदरचा माल पुणे येथे पोहच करण्यासाठी दोघेजण निघाले होते. ट्रक चालक अरुण उदमले (रा. पोखरी हवेली ता. संगमनेर) व अफजलखान साहेबखान पठाण (रा. मोमीनपुरा, संगमनेर) यांनी सदरचा ट्रक पुणे येथे पोहच न करता त्याचा अपहार केला होता.

याप्रकरणी अशोककुमार चौधरी (रा. सुरत) यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना किशोर पडदूने हा गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले होते.

तो नगर शहरातील एकविरा चौकात भाड्याने फ्लॅटमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.