अहमदनगर – जिल्हा रुग्णालय अग्नीतांडव प्रकरणी सहा जणांना निलंबित केले आणि त्यानंतर चौघांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. ही कारवाई मागे घ्यावी, यासाठी गुरूवारी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी जिल्हा काम बंद आंदोलन केले.

दरम्यान आता हे प्रकरण चिघळू लागले आहे. चौघांवरील दाखल गुन्हे मागे न घेतल्यास इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांच्या वतीने राज्य पातळीवर काम बंद इशारा देण्यात आला असून वेळ पडल्यास अत्यावश्यक रुग्णसेवाही बंद करण्याचा विचार सुरु असल्याचे संघटनेचे सचिव डॉ. सचिन वाहडणे यांनी सांगितले.

दरम्यान, गुरूवारी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात झालेल्या निषेध सभेत आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे म्हणाले, डॉक्टर आणि परिचारिका या रुग्णांवर उपचार करत असतात. ही सेवा देत असताना त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही अन्य प्रशासकीय यंत्रणांची आहे.

रुग्णालयाला आग लागल्यानंतर अग्नीशमन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, इलेक्ट्रिकल विभाग यांच्यामार्फत गेल्या काही कालावधीत तपासण्या, ऑडिट केलेले आहे का? हे तपासणे गरजेचे आहे. रुग्णांवर उपचार करतांना त्यात हालर्गीपणा झाल्यास संबंधीतांना जबाबदार धरावे,

मात्र, या सारखे प्रकार घडल्यानंतर ज्या विभागाने त्यांची बांधणी केलेली आहे, अन्य विभागाने केलेल्या कामाची चौकशी सोडून डॉक्टर आणि परिचारिका यांच्यावर कारवाई करणे चुकीचे आहे. यामुळे दाखल गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.