अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरूद्ध खंडणी व भ्रष्टाचाराच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने महाराष्ट्रातील १२ ठिकाणी छापे घातले.

मंगळवारी आणि बुधवारी करण्यात आलेल्या कारवाईत सीबीआय अधिकाऱ्यांनी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सांगली आणि अहमदनगर या ठिकाणी छापे घातले आहेत. माहितीनुसार, मुंबई आणि अहमदनगर येथील सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील आणि पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांच्याशी संबंधित असलेल्या जागेचा या प्रकरणातील संशयित मध्यस्थांकडून शोध घेण्यात आला.

मुंबईचे माजी पोलीस आरुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कथित दरमहा 100 कोटी वसुली टार्गेट दिल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून अनेक धक्कादायक माहिती पुढे येत आहे. पोलिस अधिकारी सचिन वाझे सध्या कोठडीत आहेत.

अन्य अधिकार्‍यांचीही नावे यात जोडली जात आहे. दरम्यान, याप्रकरणी हायकोर्टाच्या आदेशाने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग व ईडी यांच्याकडून चौकशी सुरू असून आज सीबीआयने मोठी कारवाई केली. सीबीआयकडून मुंबई, ठाणे, पुणे नाशिक आणि अहमदनगर या शहरांतील 12 ठिकाणी छापे टाकण्यात आले असून त्यात दोन बड्या पोलीस अधिकार्‍यांशी संबंधित ठिकाणांचीही झडती घेण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

मुंबई पोलीस दलातील दोन पोलीस अधिकार्‍यांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांच्या अहमदनगर मधील घरावर तसेच सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या पुणे येथील घरावर छापा टाकून सीबीआय टीमने झडती घेतली आहे.

मुंबई पोलीस दलात उपायुक्त असलेल्या राजू भुजबळ यांचे घर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असून ईडीच्या पथकाने मंगळवारी (27 जुलै) तिथे छापा टाकला. ईडीची टीम दोन वाहनांतून आली होती. त्यांनी भुजबळ यांच्या कुटुंबीयांचे जबाब घेतले तसेच कागदपत्रेही तपासल्याचे सांगण्यात येत आहे.

स्थानिक पोलिसांकडे मात्र याबाबत कोणतीच माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करत असताना ईडीच्या हाती काही कॉल डीटेल्स आणि व्हॉट्सअ‍ॅप चॅट डाटा सापडला असून त्याआधारावर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची चौकशी सुरू करण्यात आल्याचे समजतेे.

परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपात सहायक निरीक्षक सचिन वाझेंसह पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांच्याही नावाचा उल्लेख आहे. भुजबळ मूळचे संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा या गावातील आहेत. त्यामुळे मंगळवारी ईडीच्या पथकाने तेथे जाऊन सुमारे तीन तास कसून चौकशी केली.

पोलीस उपायुक्त भुजबळ गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबासह मुंबईतच राहतात. मात्र त्यांची शेतजमीन व अन्य नातेवाईक गावीच आहेत. त्यांच्याकडे चौकशी करताना त्यांच्या गावाकडील घर आणि नातेवाईकांची माहिती मिळाल्याने पथकाने त्यांच्या गावी जाऊन नातेवाईकांचे जवाब घेतले.

भुजबळ यांच्या येथील नातेवाईकांचे जवाब नोंदवून घेतले. या चौकशीतून नेमके काय समोर आले आहे, याबाबत अद्याप निश्‍चित कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयकडून या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून देशमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच देशमुख यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरांची झडतीही घेण्यात आली आहे. ईडीनेही त्यांच्याविरोधात मनी लाँर्डिंगचा गुन्हा दाखल केला असून त्यांच्या दोन खासगी सचिवांनाही अटक केली आहे. या प्रकरणात संजय पाटील आणि राजु पाटील यांचीही चौकशी सुरू आहे.