अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- जेवणाच्या बिलाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून हॉटेल मालकास बेदम मारहाण करत गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न एकाने केल्याचा प्रकार जामखेड तालुक्यातील नान्नज या गावात शुक्रवारी रात्री घडला.

ईस्माईल महेमूद शेख असे खुनाचा प्रयत्न करणार्‍या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्यास अटक केली आहे. याप्रकरणी निजाम शेख यांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निजाम शेख यांचे नान्नज येथे ब्ल्यू डायमंड नावाचे हॉटेल आहे. संशयित ईस्माईल हा दुपारी जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये आला होता.

जेवण झाल्यानंतर जेवणाचे बील हॉटेल मालक निजाम शेख यांनी मागितल्याचा राग आल्याने ईस्माईल याने पेप्सी, सेवनअप अशा थंड पेयाच्या बाटल्या फेकून मारल्या तसेच त्यातील एक बाटली अर्धी फोडून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

यानंतर हॅाटेलमालकास पकडून दोन्ही हाताने गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अखेर निजाम यांनी कशीबशी आपली सुटका करून घेत पळ काढल्याने ते बचावले. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात ईस्माईल शेख विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.