अहिल्यानगरमधील या नगरपंचायतीत राजकीय भूकंप ! ११ नगरसेवकांनी बदलला पक्ष, शरद पवार गटाला मोठा धक्का

कर्जत नगरपंचायतीमध्ये शरद पवार गटाला धक्का बसला आहे. राष्ट्रवादी (पवार गट) व काँग्रेसचे मिळून ११ नगरसेवक आमदार राम शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजपच्या गुप्त बैठकीत सहभागी झाले होते.

Published on -

कर्जत नगरपंचायतीत मोठ्या राजकीय उलथापालथीची तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ८ नगरसेवक आणि काँग्रेसचे ३ नगरसेवक यांनी भाजप नेते व आमदार प्रा. राम शिंदे यांच्यासोबत गुप्त बैठक घेतल्याने सत्ताबदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. रविवारी रात्री झालेल्या या बैठकीने स्थानिक राजकारणात खळबळ उडवली असून आमदार रोहित पवार यांच्यासाठी मोठी धक्का मानला जात आहे.

शरद पवार गटाचे बहुमत

कर्जत नगरपंचायतीमध्ये याआधी राष्ट्रवादी शरद पवार गटाने १२ जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळवले होते. काँग्रेसच्या ३ नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे सत्तास्थापन सुलभ झाल होत. नगराध्यक्षपदी उषा राऊत आणि उपनगराध्यक्षपदी रोहिणी घुले या निवडल्या गेल्या होत्या. महाविकास आघाडीच्या काळात ही सत्ता स्थिर वाटत होती, परंतु कालांतराने आंतरिक नाराजी उफाळून आली.

नगरसेवकांमध्ये नाराजी

सत्तेतील सर्व प्रमुख पदे एका कुटुंबाच्या ताब्यात गेल्यामुळे अनेक इच्छुक नगरसेवकांमध्ये असंतोष निर्माण झाला. या नाराजीचा फायदा भाजपने घेतला आहे. विकासकामांमध्ये मागे पडल्याची भावना आणि निधी मिळवण्याची अडचण यामुळे नगरसेवक भाजपच्या संपर्कात आले. या पार्श्वभूमीवर रामनवमीच्या दिवशी ११ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

सत्तेचा नवा अध्याय सूरू

भाजप आमदार प्रा. राम शिंदे यांनी हे संधीचं सोने करत नाराज नगरसेवकांना एकत्र आणलं. त्यांचं म्हणणं आहे की, महायुती सरकारच्या माध्यमातून विकासकामे जलद गतीने होऊ शकतात. याच उद्देशाने नगरसेवकांनी भाजपकडे पाठिंबा वळवला आहे. या बदलामुळे कर्जत नगरपंचायतीत सत्तेचा नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता वाढली आहे.

रोहित पवारांसाठी मोठा धक्का

या सत्तांतराच्या हालचालींमुळे रोहित पवार यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. त्यांनी मिळवलेली मजबूत सत्ता आता ढासळण्याच्या मार्गावर आहे. स्थानिक पातळीवर ही राजकीय घडामोड महत्त्वाची असून, आगामी निवडणुकांवरही त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. महायुतीच्या बळकटीसाठी ही घटना निर्णायक ठरू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe