नेवासा तालुक्यातील चांदा येथे घोडेगाव चांदा रोडवर पंचवटी कलेक्शन शेजारी असलेले सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. याबाबत मिळालेली माहिती अशी की,
चांदा येथील चांदा-घोडेगाव रोड लगत असलेल्या पंचवटी कलेक्शन शेजारी असलेले सेंट्रल बँकेचे एटीएम काल बुधवारी पहाटे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान चार अज्ञात चोरट्यांनी
येथील पंचवटी कलेक्शन शेजारीची जाळी वाकुन एटीएमच्या बाहेचे कॅमेरे फिरवले व आतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारला व नंतर चोरट्यांनी एटीएम गॅस कटरच्या साह्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला.
पण तो अयशस्वी झाला. हे चोरट्यांच्या लक्षात येताच नंतर एका चोरट्यांने शेजारीच असलेल्या जावळे यांच्या जनावरांच्या गोठ्यातील पहार व ‘कटवणी आणण्यासाठी गेला असता, जावळे हे पडवीत झोपलेले होते.
त्यांना गोठ्यात आवाज आला व उठून पुढे होऊन बघितले, तर कोणीतरी तिथून पळालेले त्यांना दिसले. त्यांनी तात्काळ एटीएम जवळ राहणारे बाळासाहेब जावळे यांना फोन करुन तुमच्या घराकडे कोणीतरी पळाले, असे सांगितले.
तेव्हा बाळासाहेब जावळे यांनी घरातून ‘पंचवटी कलेक्शनकडे असणारा लाईट चालू बंद केला असता, त्यांना एटीएमच्या दिशेने आवाज आला. त्यांनी सर्वांना चोर आल्याची माहिती दिली व बाहेर येऊन पाहिले असता एटीएम फोडल्याचे दिसले.
त्यानंतर त्यांनी ‘पोलीस पाटील कैलास अभिनव यांना फोन करून माहिती दिली. त्यांनी याबाबत सोनई ‘पोलीस ठाण्याला माहिती दिली. दरम्यान, सोनई पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक चौधरी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली व सेंट्रल बँकेच्या वरीष्ठ अधिकार्यांना घटनेची माहिती दिली.
तसेच ‘परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता घटना घडण्या पुर्वी सीसीटिव्ही फुटेज मध्ये तीन चोरटे आढळून आले. त्या दृष्टीने पुढील तपासाची दिशा चालू केली. तसेच ठसे तज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. दरम्यान, शेवगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.