अहमदनगर बातम्या

Ahmednagar news : भाज्यांची दरवाढ : गृहिणींची होतेय कसरत; घेवडा, फ्लावर , बटाटे , लिंबू , हिरव्या मिरचीचे दर तेजीत

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar news : सध्या उन्हाचा पारा ४० अंशावर पोहचला असून नागरिकांना उन्हाचे चांगलेच चटके बसत आहेत. तर दुसरीकडे महागाईचा वणवा भडकला आहे. त्यामुळे नागरिक सध्या उन्हासह महागाईच्या वणव्यात होरपळून निघत आहेत.

महागाईने अगोदरच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असून गेल्या दोन वर्षांपासून महागाईचा भडका वाढला आहे. दैनंदिन वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहे. धान्यासह डाळी, मसाले आदी वस्तूंनी उच्चांक मोडीत काढलेले आहेत. त्यात आता भाजीपाल्याची भर पडली आहे. त्यात अवकाळी पावसाने अनेक ठिकणी हजेरी लावली असून त्यामुळे पिकांचे नुकसान देखील झाले आहे. शेतमालाची आवक घटल्याने भाजीपाला महाग झाल्याने गृहिणींची रोजचे जेवण करताना मोठी कसरत होत आहे. वाढत्या उन्हामुळे अंगाची काहिली होत असून शीतपेये, लिंबूपाणी पिण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे.

उन्हाळ्यात लिंबाची मागणी प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने सध्या ११० ते १३० रुपये प्रतिकिलो ठोक बाजारात लिंबाचे दर आहेत. पाण्याची उपलब्धता असलेल्या बहुतांश ठिकाणी लिंबाचे उत्पादन घेतले जाते; परंतु वाढत्या मागणीमुळे ग्राहकांची गरज पूर्ण होत नसल्याने बाहेरून लिंबू विक्रीसाठी आणले जात आहे. याचा परिणाम लिंबाच्या भाव वाढीवर झाला आहे. दरवर्षी एप्रिल-मे मध्ये प्रचंड उन्हाचा चटका जाणवत असतो. वातावरणातील बदलामुळे नागरिकांना सध्या मे हिटचा तडाखा सोसावा लागत आहे.

उन्हाचा तडाखा वाढल्याने लिंबांना अधिक भाव आला आहे. उकाड्याने सर्वसामान्य बेहाल होत असतानाच दुसरीकडे लिंबू सरबतही नागरिकांचा घाम काढत आहे. लिंबाच्या आकारावरून त्यांच्या दरात चढउतार होत आहेत. सध्या पाच रुपयांना एक लिंबु या दराने विक्री होत आहे. तर दुसरीकडे वाढत्या उन्हाळ्यात भाजीपाल्याचे दर कडाडल्याने गृहिणींचे किचन बजेट कोलडमडले आहे. राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती ओढावली आहे. यामुळे शेतमालाच्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे.

पाण्याअभावी बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे, तसेच शेतीसाठी खर्च वाढत असून त्यातून मिळणारा नफा अत्यंत कमी आहे . त्यामुळे शेतीकडे अनेकांनी पाठ फिरवली आहे. गेल्या आठ दिवसांपासून उष्णतेचा कहर आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तापमानाने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत . भाजीपाला बाजारात कोथिंबीर, शेपू आणि मिरची आता ३० रुपयांच्या घरात पोहचली आहे. फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या किंमतींनी सर्वसामान्य हवालदिल झाले आहेत.

कोथिंबीरची एक जुडी आता ३० रुपयांना मिळते. टोमॅटोसह वांगी, कारली आणि इतर भाज्यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.राज्यातील इतर जिल्ह्यातही शेतमालाची आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या किंमती वाढल्या आहेत. वाढत्या महागाईमुळे मात्र गृहिणींना रोजचे जेवण करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

सोमवारी नगर बाजार समितीत मिळालेले दर : टोमॅटो ५०० – २५००, वांगी ५०० – ३०००, फ्लावर १००० – ५०००, कोबी ५०० – २०००, काकडी १००० – ३०००, गवार २००० – ७०००, घोसाळे १००० – ३५००, कारले २००० – ५५००, भेंडी १००० – ४०००,

घेवडा ८००० – ९०००, बटाटे १००० – ३०००, लसूण ६५०० – २०,०००, हिरवी मिरची ३००० – ६०००, शेवगा २००० – ६०००, भु. शेंग ३००० – ४५०००, लिंबू १००० – ७५००, गाजर २००० – २५००, दू. भोपळा ५०० – १५००, शि. मिरची १५०० – ६४००, मेथी १००० – २५००, कोथंबीर १००० – २५००, पालक ७०० – १०००, शेपू भाजी १५०० – २६००, चवळी ४५००, बीट १५००.

Ahmednagarlive24 Office