अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातून भारत गॅस पाईललाईनचे काम सुरू आहे. या कामाच्या ठेकेदाराकडून एक मोठा नेता ५० लाख रुपयांची खंडणी मागत आहे. या खंडणीबहाद्दर नेत्याचे सर्व पुरावे गोळा केले असल्याने या नेत्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे बुरखा फाडणार असल्याचा इशारा श्रीगोंदे बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहटा यांनी दिला आहे.

श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाळासाहेब नाहटा यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, आख्तर शेख, बापुराव सिदनकर उपस्थित होते. नाहाटा म्हणाले, कुणाचाच प्रशासनावर वचक नाही. एकाच राजकीय पक्षाची शहरात दोन दोन कार्यालय आहेत. पण ती जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नाहीत. तालुक्यातील हजारो तरुण बेरोजगार आहेत.

त्यांना रोजगार कसा मिळेल यासाठी कुणी प्रयत्न करत नाही. कोरोना काळात ऑक्सिजन सिलेंडरच्या प्रश्नाबाबत प्रांताधिकारी स्वाती दाभाडे यांनी ती प्रशासनाची जबाबदारी आहे, तुम्ही काळजी करू नका, असे म्हणून दुर्लक्ष केले. वेळेवर ऑक्सिजन मिळाला असता तर भाजपचे तत्कालीन शहराध्यक्ष संतोष खेतमळीस यांना आपला जीव गमवावा लागला नसता, अशी खंत नाहाटा यांनी व्यक्त केली.

अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांच्यावरही टिळक भोस यांनी आरोप केले. नाहाटा म्हणाले, ठेकेदाराला एका नेत्याचे दहा ते पंधरा कार्यकर्ते जाऊन खंडणी मागतात काम बंद पाडतात. आमच्या नेत्याशी बोला म्हणतात, तो नेता कोण?

असा सवाल उपस्थित करून हा गैरप्रकार खपवून घेणार नसून संबंधित ठेकेदाराला घेऊन या नेत्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार व दिल्लीत शरद पवार तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पुरावे देऊन न्याय मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. तो नेता राष्ट्रवादीचा आहे का, असे विचारले असता त्यांनी बोलणे टाळले.

तसेच खंडणी मागणाऱ्या नेत्याचे नाव जाहीर करा, असे सांगितल्यावर देखील नाव सांगण्याचे टाळत त्याबाबत योग्य ठिकाणी न्याय मागणार आहे, असे सांगून त्या नेत्याचे नाव सांगणे त्यांनी वारंवार टाळले.