Ahmednagar Breaking : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके यांची खासदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, असा फलक लावणाऱ्या कार्यकर्त्यावर पाथर्डी पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि. ३०) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तन्वीर भैय्या अवतार (रा. पाथर्डी, ता.नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. याबाबत शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघातील आचारसंहिता कक्षात नियुक्त असलेले शेवगाव पंचायत समितीतील अभियंता निलेश विठ्ठल झिरपे यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आचार संहिता कक्षाचे प्रमुख तथा शेवगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी फिर्यादी झिरपे यांना गुरुवारी (दि.३०) सायंकाळी फोन करून कळविले की, पाथर्डी बसस्थानकाबाहेर नगरकडे जाणाऱ्या रोडवर लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच
नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके यांची खासदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, असा फलक लावून आचार संहितेचा भंग करण्यात आला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तत्काळ पथकासह जावून कारवाई करण्यात यावी.
या सूचनेनुसार फिर्यादी झिरपे यांनी पथकासह तेथे जावून पाहणी केली असता त्यांना अशा प्रकारचा फलक लावण्यात आल्याचे दिसून आले. या फलकावर शुभेच्छुक म्हणून तन्वीर भैय्या अवतार मित्र परिवार असा मजकूर दिसून आला.
त्यामुळे झिरपे यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी तन्वीर भैय्या अवतार याच्या विरुद्ध महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरणास प्रतिबंध अधिनियम १९९५ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.