Ahmednagar News : दहा रुपयांची फाटकी नोट घेतली नाही म्हणून दुकानच पेटवून दिले, अहमदनगरमधील घटना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : एकाने ऑईल टाकून दुकान दुकान पेटवून दिल्याची घटना शहरातील कोठी चौकात घडली. १० रुपयांची फाटकी नोट घेण्यास नकार दिल्याने राग येवून हे कृत्य केले असल्याची माहिती मिळाली आहे. दुकान पेटवून नुकसान करणाऱ्या या आरोपीला पोलिसांनी सोमवारी (दि.२९) रात्री अटक केली आहे.

विजय दिलीप झेंडे (वय २६, रा. सात खोल्या, नगर कॉलेजजवळ, अहमदनगर) असे या आरोपीचे नाव आहे. याबाबत रंजना अजय बसापुरे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी बसापुरे यांचे कोठी चौकातील पाटील हॉस्पिटल समोर महावीर दुध डेअरी व जनरल स्टोअर या नावाचे दुकान आहे. रविवारी (दि.२८) बसापुरे या दुकानात असताना आरोपी विजय झेंडे दुकानात आला.

त्याने वस्तू खरेदीसाठी १० रुपयांची फाटकी नोट दिली. ती घेण्यास बसापुरे यांनी नकार दिला. त्याचा राग येवून आरोपी झेंडे याने रात्री १० च्या सुमारास ऑईल घेवून येत ते दुकानात ओतत दुकानात आग लावली.

या आगीत दुकानातील लाकडी काऊंटर, लहान मोठ्या बरण्या व इतर साहित्य असे २० हजारांचे साहित्य जळून नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी विजय झेंडे याच्या विरुद्ध भा.दं. वि.कलम ४३६, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सोमवारी (दि.२९) सायंकाळी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी रात्री उशिरा आरोपीला अटक केली आहे. दरम्यान नगर शहरात अनेक गुन्हेगारी घटना वारंवार समोर येताना दिसत आहेत. मारामारी, चोरी, खून आदी गुन्हेगारी शहरात घडत आहेत. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.