Ahmednagar News : महाराष्ट्रभर गाजेलला नगर अर्बन घोटाळाप्रकरणाच्या तपासनीस आता वेग येऊ लागला आहे. अनेक लोक या प्रकरणी अटकेत असून पोलीस त्यांची कसून तपासणी करत आहेत. आता या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका व्यापाऱ्यास पुण्यातून अटक केली आहे.
त्यामुळे व्यापारीवर्गात खळबळ उडाली असून मोठी माहिती तपासात समोर येऊ शकते असे म्हटले जात आहे. अक्षय राजेंद्र लुणावत (वय ३५, रा. एल रिगेलो अपार्टमेंट, होले वस्ती चौक, उंड्री, पुणे) असे अटक केलेल्या व्यापाऱ्याचे नाव असून, त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असताना पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
नगर अर्बन घोटाळा प्रकरणातील आरोपी लुणावत हे सध्या पुण्यात राहत आहेत. त्यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी सकाळी ताब्यात घेऊन अहमदनगरला आणले. फॉरेन्सिक ऑडिटमध्ये आरोपी लुणावत यांचा बँकेच्या घोटाळ्यात सक्रिय सहभाग असल्याचे समोर आलेले आहे.
ते कल्पद्रुमा ज्वेल्स अॅण्ड जेम्स लि कंपनीचे संचालक आहेत. त्यांनी बँकेचे पदाधिकारी, अधिकारी आणि संचालकांशी संगनमत करून कल्पद्रुमा कंपनीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार केली. त्यांच्या आधारे कंपनीचे वाढीव मूल्यांकन दाखवून नगर अर्बन बँकेकडून वेळोवेळी मोठ्या रकमेचे कर्ज घेतले.
या कर्जाचा गैरविनियोग केला. त्यांच्या कंपनीकडे आठ कोटींहून अधिक थकबाकी आहे. या कर्जाची त्यांनी परतफेड केली नाही. २०१५ मध्ये घेतलेले ६ कोटींचे कर्ज परतफेड करण्यासाठी त्यांनी टेरासॉफ्ट टेक्नॉलॉजीच्या नावे ३ कोटी ५ लाखांचे कर्ज घेतले.
ही रक्कम माउली टेडसर्चच्या खात्यात जमा केले. या खात्यातून रोख पैसे काढून कर्ज निरंक केल्याचे दाखविले असून, याबाबत आरोपी कुठलीही माहिती देत नाही. त्यामुळे पोलिसांकडून आरोपीच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले.
कर्जाची रक्कम कुणाच्या खात्यात गेली?
आरोपी लुणावत यांच्या बँक खात्यातून काही रक्कम नगर अर्बन बँकेचा तत्कालीन संचालक नवनीत सुरपूरीया व डॉ. नीलेश शेळके यांच्या बँक खात्यात जमा झालेली आहे. कर्जमंजुरीच्या बदल्यात ही रक्कम जमा करण्यात आली असावी, असा पोलिसांना संशय आहे. याबाबत आरोपीकडे चौकशी करण्यात येत आहे.