Ahmednagar News : नदीपात्रातून अवैधरित्या होणारा वाळू उपसा आणि वाहनांमधून होणारी वाहतूक यावर कारवाई करण्यासाठी नियुक्त केलेल्या महसूल पथकातील महिला मंडलाधिकारी आणि दोन तलाठी यांच्या अंगावर वाळूने भरलेली रिक्षा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना रविवारी सकाळी प्रवरा नदी परिसरातील गंगामाई घाट येथे घडली.
संबंधीत महिला मंडलाधिकारी यांनी संगमनेरच्या तहसीलदारांना अहवाल पाठवल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. रिक्षाच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तालुक्यातील घारगाव येथील मंडलाधिकारी संगिता रंगनाथ चतुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तहसीलदार धीरज मांजरे यांच्या आदेशानुसार मंडलाधिकारी चतुरे आणि पेमगिरी येथील तलाठी सुरेखा विश्वनाथ कानवडे, अलकापूर येथील तलाठी दिपाली नामदेव ढोले या वाळू उपसा रोखण्यासाठी वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांविरुद्ध कारवाई करण्यासाठी गंगामाई घाट परिसरात गस्त घालत होत्या.
त्यावेळी रिक्षामध्ये वाळू भरली असल्याचे पथकाच्या लक्षात आले. रिक्षाचालकाने मास्क घातलेला होता. त्याला आवाज दिला असता तो रिक्षा सोडून नदीपात्रात पळून गेला. पथकातील महिलांनी त्याचा पाठलाग केला, असेही फिर्यादी म्हटले आहे. गोण्यात भरलेली वाळू तसेच ७० हजार रुपये किंमतीची रिक्षा असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गंगामाई घाट परिसरातील नदीपात्रात बुडून दोन मुलांचा जीव गेल्याची घटना ताजी आहे. मात्र त्याच परिसरात अगदी तीन चार दिवसात पुन्हा अवैधरित्या वाळू उपसा सुरु असल्याचे महसूल विभागाच्या कारवाईतून समोर आले आहे.
वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकातील तीन महिलांच्या अंगावर रिक्षा घालण्याचा प्रकार गंभीर आहे. त्याचा फिर्यादीत उल्लेख केलेला नाही. संबंधीत रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गंगामाई घाट परिसरातून पुन्हा अवैध वाळू उपसा सुरू झाला असल्याचे चित्र आहे.