Ahmednagar News : एकीकडे मागील वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे राज्यासह जिल्ह्यातील अनेक भागात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे.शेतकरी शेतातील पेरणीपूर्व मशागतची कामे आटोपून पावसाची वाट पाहत आहे. तर दुसरीकडे ऐन खरीप हंगाम अगदी तोंडावर आला असताना रासायनिक खतांच्या किमतींमध्ये भरमसाठ वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे.
यामुळे शेतमालाच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. परिणामी शेतकऱ्यांना शेतमालाचा उत्पादन खर्च आणि नफा यांची सांगड घालताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीत शेतीसाठी रासायनिक खताशिवाय शेती करणे काही अंशी अशक्य असल्याचे दिसून येते. कारण सरकारची धोरणे आणि निसर्गाचा लहरीपणामुळे अल्पभूधारक शेतकऱ्याचे प्रचंड हाल होत आहेत.
शेती उत्पादनासाठी रासायनिक खते महत्वाची भूमिका बजावतात; मात्र गेल्या काही वर्षात रासायनिक खतांची सतत दरवाढ होत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडत असल्याची स्थिती आहे. पिक वाढीसाठी रासायनिक खतांची गरज असताना अनेक कृषी केंद्रांवर युरीया खताचा तुटवडा जाणवत आहे.
जिल्हयात खरीपाची पेरणी जून महिन्यात होत असली तरी मे महिन्यापासूनच खतांची खरेदी सुरु होते. शिवाय उन्हाळी पिके व ऊसासाठी पुरेशा मात्रा देणे गरजेचे असल्याने रासायनिक खतांची मागणी होत आहे, परंतु खतांच्या भावात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक भार सोसावा लागणार आहे. अधिकच्या खर्चाचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
मागील अनेक वर्षापासून शेतमालाचे भाव फारसे वाढलेले नाहीत. मात्र खते, बियाणे, मजुरी आदिच्या दरात बरीच वाढ झाली आहे. कंपन्यांमध्ये तयार होणाऱ्या मालाच्या बाजारभावात नियमित वाढ होतच आहे, मात्र शेतमालांचे बाजारभाव स्थिर अन उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी आहेत.
शेतमालाचे बाजारभाव पडल्याने शेती परवडणारी नाही, अशीच काहीशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. भारतातील एकूण जीडीपी पैकी पंधरा टक्के एवढा मोठा वाटा हा शेती व्यवसायाचा आहे असे असले तरी देखील प्रत्येक सरकारकडून शेतकऱ्यांची मात्र हेळसांड झाल्याचे बघायला मिळत आहे. शेतकऱ्यांना ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या वेळच्या वेळी न पुरवल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे.याकडे मात्र कोणीच लक्ष देत नाही.