Ahmednagar News : भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने बुलेटस्वारांना धडक दिली, त्यामुळे झालेल्या अपघातामध्ये बुलेटवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
घोटी असणाऱ्या मार्केटजवळ बुलेटवरून आपल्या घरी जाणाऱ्या दोघांना मालवाहू कंटेनरने जोराची धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघात झाल्यानंतर कंटेनरचालकाने मदत न करता घटनास्थळावरून पसार झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात कंटेनर चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना रविवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील समनापूर परिसरात घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत रवींद्र भुजबळ (वय ३३) व गोरख सयाजी पर्वत (वय ४०, दोघे रा. निंबाळे, ता. संगमनेर), अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. अपघातातील मयत तरुण (एम.एच. १४ एच.टी. ५००६) क्रमांकाच्या बुलेट मोटरसायकलवरून कोल्हार-घोटी राज्य मार्गाने संगमनेर-लोणी रोडने घरी जात होते.
समनापूर परिसरामध्ये अज्ञात कंटेनर चालकाने या बुलेटस्वारांना पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातामध्ये बुलेटवरील दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती समजताच स्थानिक ग्रामस्थ अपघात स्थळी जमा झाले.
याप्रकरणी सोमनाथ रवींद्र भुजबळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसते. समृद्धी महामार्गावर देखील अपघातांची मालिका सुरूच असल्याचे दिसते. अहमदनगर जिल्ह्यातही अपघातांचे व त्यात मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. रस्त्यांची झालेली दुर्दशा, अनियंत्रित वेग, वाहनांवरील नियंत्रण सुटणे आदी गोष्टी अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. अपघातानंतर मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पसार होण्याचे प्रमाणही वाढत आहे.