Ahmednagar News : पवारांच्या कारखान्याची फसवणूक महागात ! अहमदनगर जिल्ह्यातील नेत्याला अखेर अटक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News :- सातारा जिल्ह्यातील शरयू कारखान्याची फसवणूक केल्याच्या आरोपावरून भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांना सातारा पोलिसांनी गुरुवारी पहाटे ताब्यात घेतले आहे. त्यांची सातारा येथील पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर यांनी दिली.

शरयु अँग्रो इंडस्ट्रीज लि. या साखर कारखान्याची जवळपास एक कोटी चौदा लाख रुपयांची फसवणूक झालेली असून, यात लोढा यांच्यासह एक ठेकेदार तसेच शरयू इंडस्ट्रीज लि. चे तीन इंजिनिअर सहभागी असल्याच्या तक्रारीवरून लोणंद पोलिसांत एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे.

श्रीनिवास पवार यांच्या कारखान्याची साखर आर्थिक फसवणूक
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या कारखान्याची साखर आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपावरून भाजपाचा नेता वसंत लोढा याला सातारा पोलिसांनी गुरुवारी (दि. २७) पहाटे ताब्यात घेतले. त्याला सातारा पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

यांच्यावर गुन्हे दाखल
भाजप नेता वसंत लोढा, प्रसाद अण्णा (रा. सांगली), शरयू इंडस्ट्रिजमधील संतोष पोपट होले (सिनिअर इंजिनिअर, रा. जाधववाडी, ता. फलटण, जि. सातारा. महादेव अनंत भंडारे ( चिफ इंजिनिअर, रा. कराड, जि. सातारा), संजय अनिरुद्ध मुळे सिनियर इंजिनिअर, रा. उंबरे, ता. पांढरे) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

कारखान्यातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी शरयू कारखान्याचे अविनाश शिवाजी भापकर (रा. आसू, ता. फलटण, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या कापशी ( ता. फलटण, जि. सातारा) येथील शरयू अॅग्रो इंडस्ट्रीज लि. या साखर कारखान्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम भाजप नेता वसंत लोढा याच्या मालकीची फेब्रिक्स इंडस्ट्रिज ( लोढा निवास, आनंदीबाजार, अहमदनगर) व प्रसाद अण्णा याच्या अॅक्युरेट इंजिनिअरिंग अॅण्ड इरेक्शन ( सांगली शाखा) कंपनीला मिळाले होते.

त्यांनी नवीन काम न करता पूर्वीच्याच मशिनरी, पॅनल, बॉक्स, पाईप आदी साहित्य नवीन टाकल्याचा बनाव करून कारखान्याची १ कोटी १४ लाख ९० हजार ५३८ रुपयांची फसवणूक केली आहे.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती, अशी शरयू इंडस्ट्रिज साखर कारखान्याने २०२१ मध्ये देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी निविदा मागविल्या होत्या. त्यावेळी वसंत लोढा व प्रसाद अण्णा याच्या कंपन्यांनी दरपत्रक सादर केले होते.

त्यासोबत वेगवेगळ्या क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्याची कागदपत्रेही जोडली होती. आम्ही कारखान्याचे चांगले काम करून देऊ, असे सांगून या कंपन्यांनी विश्वास संपादन केला. त्यानुसार कारखान्याने दोन्ही कंपन्यांना ऑगस्ट २०२१ मध्ये कार्यारंभ आदेश दिला. या दोन्ही कंपन्यांनी कारखान्याला वेळोवेळी बिले सादर केली.

त्यानुसार कारखान्याने फैब्रिक्स कंपनीला १ कोटी ६७ लाख, तर अॅक्युरेट कंपनीला ८६ लाख १२ हजार रुपये अदा केले. परंतु कार्यारंभ आदेशाप्रमाणे काम झाले नाही. त्यामुळे कारखान्याने दोन्ही कंपन्यांची कागदपत्रे तपासली. ती खोटी निघाली.

त्यामुळे कारखान्याने ठेकेदार कंपन्यांनी केलेल्या कामाची सखोल चौकशी केली असता हे काम न करता अधिकाऱ्यांना हाताशी धरून लोढ़ा व प्रसाद अण्णा या दोघांच्या कंपन्यांनी कारखान्याची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

सातारा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी चौकशी करण्यासाठी पोलीस अहमदनगरमध्ये आले होते व त्यांनी लोढा यांची चौकशीही केली होती. त्यानंतर गुरुवारी पहाटे लोढा यांना त्यांच्या दूरगाव येथील नातेवाईकांच्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.