Ahmednagar News : उष्णतेची सध्या प्रचंड लाट असून अनेक ठिकाणी उष्माघाताने मृत्यू होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. आता याच उष्माघातामुळे अहमदनगरमधील प्रसिद्ध मठाधिपती महाराजांचे निधन झाले असल्याचे वृत्त आले आहे.
शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील दध्नेश्वर शिवालयाचे मठाधिपती वारकरी संप्रदायाचे नवनाथ महाराज काळे यांचे उष्माघाताने निधन झाले. ते वृंदावन (उत्तरप्रदेश) याठिकाणी देवदर्शनासाठी गेले होते. ते ४२ वर्षांचे होते. अचानक झालेल्या या घटनेने परिसरातील भक्तगणात शोककळा पसरली आहे.
गुरुदास नवनाथ महाराज काळे यांनी उत्तरप्रदेश येथील वृंदावन येथे भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी भक्त परिवारासह २१ मे रोजी दहिगांवने येथून गेले होते.
मंगळवारी (ता. २८) रात्री देवदर्शन घेऊन गांवाकडे येत असतांना तीव्र उष्माघांतामुळे त्यांना त्रास सुरु झाला. यामुळे त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांचा मृतदेह वृंदावन येथून उशिराने दहिगांवने येथील दध्नेश्वर शिवालयात दाखल झाला. गुरुवारी सकाळी ९ वाजता भाविकांसाठी त्यांचा देह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
त्यांचा वैकुंठ गमन, उत्तर अधिकारी दीक्षा सोहळा परिसरातील वारकरी संप्रदायातील संत, महंत यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. दध्नेश्वर शिवालयाचे प्रमुख शांतीब्रह्म वै. संत कृष्णदेव महाराज काळे यांचे उत्तराधिकारी शिष्य होते. अत्यंत शांत, संयमी व अभ्यासू व्यक्तीमत्व, अध्यात्मिक क्षेत्रात ओळख निर्माण केली होती. राज्यात शांतीब्रह्म वै. संत- कृष्णदेव महाराज काळे यांना माननारा मोठा भक्त परिवार आहे.
त्यांच्या पश्चात उत्तराधिकारी म्हणून नवनाथ महाराज काळे यांनी वारकरी संप्रदायात भक्ती मार्गातून सेवा देण्याचे काम अखंड चालू ठेवत भक्त परिवारात नावलौकिक मिळविला होता. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच सर्व व्यापारी व ग्रामस्थांनी गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.