राज्यात विविध कर्मचाऱ्यांचे सध्या संप सुरू आहेत. आता विविध मागण्यांसाठी ग्रामसेवकांनी तीन दिवसीय कामबंद आंदोलन पुकारले आहे. दि.१८ ते २० डिसेंबर दरम्यान हे सर्व ग्रामसेवक संपावर गेले आहेत.
या कामबंद आंदोलनात अहमदनगर जिल्ह्यातील ९१६ ग्रामसेवकांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एक हजार ग्रामपंचायतीचे कामकाज कोलमडले असून गावकारभार ठप्प झाला आहे.
का पुकारला आहे संप :- ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण, ग्रामविकास अधिकाऱ्यांकडील अतिरिक्त कामे कमी करणे, पदांचे सेवा प्रवेश नियम सुधारणा, विस्तार अधिकारी पदाची संख्य वाढवणे आदी ग्रामसेवकांच्या मागण्या असून
शासन दरबारी प्रलंबित विविध मागण्यांची पूर्तता होत नाही असे ग्रामसेवकांचे म्हणणे आहे. त्यामुळे १८ ते २० डिसेंबर या कालावधीत कामबंद आंदोलन पुकारले आहे. संपूर्ण राज्यात हे आंदोलन सुरु असल्याने प्रशासकीय कामकाज ठप्प झाले.
किती कर्मचारी सहभागी :- जिल्ह्यात २२८ ग्रामविकास अधिकारी व ७९१ ग्रामसेवक आहेत. त्यापैकी ४९ ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी रजेवर आहेत. ९१६ ग्रामसेवक आंदोलनात सहभागी झाले आहेत. ६२ ग्रामसेवक व अधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला नाही अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने दिलेली आहे.
मूलभूत कामे ठप्प :- या बंदचा परिणाम गावगाड्यावर झाला. अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा ठप्प झाला तर अनेक ठिकाणी स्वच्छतेची कामे झाली नाहीत. बहुतांश ग्रामपंचायतींना कुलूप असल्याने नागरिकांचे दाखले, उतारे आदी कामे खोळंबली होती.