Ahmednagar News : शहर हद्दीत असणाऱ्या लेंडी नाला येथे पाझर तलावासाठी संपादीत केलेली जमीन अनेक बड्या लोकांनी एकत्र येत लुबाडली. ही जमीन बेकायदेशीररित्या एनए (बिनशेती) करण्यात आली. तो एनएचा आदेश आता तहसीलदारांनी रद्द केला आहे.
याप्रकरणी चौकशीसाठी आंदोलनाचा इशारा बीआरएसचे समन्वयक टिळक भोस यांनी दिला आहे. दरम्यान, सदर खरेदी कायदेशीर असून एनए रद्दला आम्ही न्यायालयात आव्हान देत असल्याचा खुलासा माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी केला. नगर जिल्ह्यात श्रीगोंदा शहरालगत असलेल्या लेंडी नाल्याजवळील ३.१५ हेक्टर जमीन पाझर तलावासाठी पाटबंधारे विभागाने संपादित केलेली आहे.
असे असताना या जमिनीची खरेदी करुन तिचा व्यावसायिक वापर करण्यासाठी ती चक्क बिगरशेती करण्यात आली, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जमिनीची खरेदी करणाऱ्यांत श्रीगोंद्याचे माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे व पेट्रोकेमिकल्स महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक भाऊसाहेब दांगडे यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे.
शेतकरी कामगार महासंघाचे उपाध्यक्ष टिळक भोस व सतीश बोरुडे यांनी विभागीय आयुक्तांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर तहसीलदारांनी जमिनीचे बिगरशेतीचे आदेश तातडीने रद्द केले आहेत. भोस यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाझर तलावासाठी संपादित केलेल्या या जमिनीचा मोबदला शासनाने संबंधित मालकाला दिला आहे. १९८० साली या जमिनीचा अवॉर्ड झालेला आहे.
असे असताना मूळ मालकाकडून दांगडे यांचा मुलगा रोहित, सून प्राची व इतर नातेवाईक तसेच पोटे यांसह अनेकांनी ही जमीन खरेदी केली. नंतर शासनाची फसवणूक करत जमीन बिगरशेती देखील करण्यात आली. ही जमीन शहरालगत असल्याने तिचे आज कोट्यवधीचे मूल्य आहे.
नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर तहसिलदारांनी बिरशेतीचा आदेश रद्द केला आहे. दांगडे हे नगरला महसूल खात्यात वरिष्ठ अधिकारी होते. त्यांनी व पोटे यांनी प्रशासनावर दबाव आणून हा सर्व प्रकार केला.
त्यामुळे त्यांचेसह या प्रकरणात सामील असणाऱ्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांची चौकशी होऊन गुन्हे दाखल व्हावेत. अन्यथा आझाद मैदानात उपोषण करण्याचा इशारा भोस यांनी दिला आहे. या प्रकरणात सतीश नारायण कसरे, संतोष किसन टकले, गोपाळ वसंतराव पवार, वसुंधरा शशिकांत देशमुख, मोहन बापू शिंदे, संभाजी शिवाजी मोरे, सचिन नारायण कसरे, उमेश कुंडलिक चव्हाण (घुगलवडगाव), सोपान नामदेव शिंदे, चंद्रशेखर पोपटराव काळे, वृषाली कोंडीबा गोरे, लालासाहेब रामचंद्र फाळके (काष्टी) या सर्वांनी बेकायदेशीर बिगरशेती प्रकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केले होते, असे भोस
यांचे म्हणणे आहे.
आम्ही न्यायालयात दाद मागत आहोत…
सदर जमीन आम्ही नियमानुसार खरेदी केली आहे. याप्रकरणी आम्ही न्यायालयात दाद मागत आहोत. तहसिलदारांनी बेकायदेशीरपणे बिगरशेती आदेश रद्द केला आहे अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी दिलीये.