Ahmednagar News : नगर मनमाड महामार्गावर बसस्थानकासमोर कंटेनर व दुचाकी यांच्या अपघातात शहरातील प्रतिष्ठित व्यापारी व माजी नगरसेवक कुंदनमल सुराणा हे जागीच ठार झाले. हा अपघात शनिवारी (दि. १८) सायंकाळी झाला.
राहुरी नगर परिषदेचे माजी नगरसेवक तसेच शहरातील प्रतिष्ठित व्यापारी कुंदनमल मानकचंद सुराणा (वय ७३, रा. गोकुळ कॉलनी) हे सायंकाळी साडेपाच वाजताचे दरम्यान शहरातून नगर-मनमाड रस्त्याने त्यांच्या घराकडे दुचाकीवरून जात होते.
राहुरी बसस्थानकासमोर असताना ते एका कंटेनरच्या चाकाखाली सापडले. कंटेनरचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने ते जागीच ठार झाले. राहुरी बसस्थानकासमोर नगर- मनमाड राज्य महामार्गावर सिग्नल व गतिरोधक नसल्याने या भागात कायमच अपघात होतात.
राहुरी बसस्थानकासमोर महामार्गावर तातडीने गतिरोधक बसविण्यात यावेत. अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा असोसिएशनसह इशारा व्यापारी आरपीआयकडून अरुण साळवे यांनी दिला आहे. दरम्यान, या महामार्गावर दोन्ही बाजूने अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याची माहिती येथील लोक देतात.
दुकानाचे फलक ते थेट महामार्गावर आणून ठेवत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांना या फलकांचा अडथळा निर्माण तर होतोच शिवाय काही व्यापारी माल थेट रस्त्यावर विक्रीसाठी आणून ठेवत असल्याने यात आणखी भर पडते. यासह आणखी काही कारणांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
ही वाहतूककोंडी होऊ नये यासाठी प्रशासनाने गाडगे महाराज आश्रम शाळा ते राहूरी जुने बसस्थानक दरम्यानच्या व्यावसायिकांनी महामार्गावर केलेले अतिक्रमण तात्काळ हटवले पाहिजे. तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना शिस्त लावली पाहिजे अशी अपेक्षावजा मागणी नागरिक करत आहेत.
कुंदनमल सुराणा यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे, तीन भाऊ असा परिवार असून परिसरात शोककळा पसरली आहे.