Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील जर आपण राजकारण बघितले तर ते प्रामुख्याने थोरात आणि विखे घराण्याच्या अवतीभवती असल्याचे आपल्याला दिसून येते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे कट्टर राजकीय विरोधक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत.
परंतु आता या विरोधाची धुरा त्यांच्या पुढच्या पिढीने सांभाळली आहे की काय? असे गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या राजकीय घटनांमुळे दिसून येत आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचार दौरे तसेच सभांचा धडाका लावलेला होता व ते त्या ठिकाणाहून निवडणूक लढण्यास देखील इच्छुक होते.
परंतु हा मतदारसंघ ऐनवेळी शिंदे गटाला गेल्यामुळे या ठिकाणी आता शिंदे गटाकडून अमोल खताळ हे रिंगणात आहेत. परंतु तरी देखील डॉ.सुजय विखे या ठिकाणाहून एक्टिव असल्याचे सध्या दिसून येत आहे व त्यांना तोडीस तोड उत्तर हे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सुकन्या जयश्री थोरात यांच्याकडून देण्यात येत आहे .
थोरात यांच्या बालेकिल्ल्यात विखेंच्या सभा
सविस्तर वृत्त असे की, अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघ म्हटला म्हणजे सगळ्यात अगोदर डोळ्यासमोर नाव येते ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे होय. हा मतदारसंघ त्यांचा बालेकिल्ला समजला जातो.
परंतु या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांच्या या बालेकिल्ल्यात माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी सभांचा धडाका लावला असून त्यामुळे संगमनेर विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. महायुतीच्या माध्यमातून हा विधानसभा मतदारसंघ शिंदे गटाला गेल्याने या ठिकाणाहून अमोल खताळ हे शिंदे गटाकडून रिंगणात आहेत.
हा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आमदार बाळासाहेब थोरात हे साधारणपणे 1985 सालापासून करत आहेत व तेव्हापासून सलग त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी विजय प्राप्त केलेला आहे.
त्यांच्या कामांमुळे विरोधकांना संस्थात्मक तसेच संघटनात्मक जाळे या मतदारसंघात आजपर्यंत निर्माण करता आलेले नाही. हा मतदारसंघ शिवसेनेच्या कोट्यात असून सेनेचे या ठिकाणी संघटन नाही. परंतु यावेळेस मात्र शिवसेनेपेक्षाही भाजपचे विखेच या ठिकाणी जास्त सक्रिय आणि आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
संगमनेर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे महत्त्वाचे मुद्दे
जर आपण संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे जर बघितले तर यामध्ये राज्यात जर महाविकास आघाडीचे सत्ता आली तर थोरात हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा राहू शकतात हा मुद्दा खूप चर्चेला आहे.
दुसरे म्हणजे सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंत देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते व माध्यमातून महिलांचा अवमानाचा मुद्दा काँग्रेस प्रत्येक सभेमध्ये मांडताना सध्या दिसून येत आहेत. महायुती कडून बघितले तर विखे प्रचारामध्ये ॲक्टिव्ह झाले असून लढत काँग्रेस आणि शिंदे सेना यांच्यात असली तरी या लढतीला किनार मात्र थोरात विरुद्ध विखे अशीच दिसून येत आहे.
अनेक बाबतीत श्रेय घेण्याची स्पर्धा देखील विखे आणि थोरात यांच्यामध्ये सध्या दिसून येत आहे. त्यामुळे होमपीच जरी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या असले तरी त्या ठिकाणी मैदान मात्र डॉ. सुजय विखे गाजवत असल्याचे दिसून येत आहे.