Ahmednagar News:-सध्या मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना घडल्याचे आपल्याला संपूर्ण राज्यांमध्ये दिसून येते. ग्रामीण भागापासून तर थेट शहरी भागापर्यंत चोरांचा सुळसुळाट झाल्याचे चित्र असून या निमित्ताने पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर मात्र प्रश्नचिन्ह उभे राहताना आपल्याला दिसून येत आहे.
चोर दररोज चोरी करण्याच्या वेगवेगळ्या युक्त्या वापरतात. अगदी याच पद्धतीने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे घडलेल्या एका चोरीच्या घटनेत चोरांनी मात्र सोन्याची चोरी करून त्यापासून कमाईचा भन्नाट फंडा वापरल्याचे दिसून आले. या ठिकाणी चोरांनी चक्क चोरलेल्या सोन्यावर मुथूट फायनान्स कडून गोल्ड लोन घेतले.
चोरलेल्या सोन्यावर चोरांनी घेतले गोल्ड लोन
याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीरामपूर शहरातील गुरुनानक नगर येथील रहिवासी असलेले प्रसाद विशाल गायकवाड व त्यांच्या मातोश्री स्वाती गायकवाड हे दहा एप्रिलला सकाळी घराला कुलूप लावून श्रीराम मंदिर व सावता रोडवरील श्री. स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी गेले होते व दुपारी जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसून आले.
त्यानंतर त्यांनी घरात जाऊन पाहिले तर घरातील बेडरूम मधील सामान अस्ताव्यस्त पसरलेले होते व दोन्ही कपाटे देखील उघडी होती. यामध्ये चोरांनी कपाटांमधील 40 हजार रुपये रोख व साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेले. त्यानंतर गायकवाड यांनी तात्काळ पोलिसांमध्ये या संबंधीची तक्रार दाखल केली.
त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवली व या चोरीच्या घटनेचा आरोपी सर्फराज उर्फ सफ्या बाबा शेख व सोने कारागीर सैफुद्दीन नजरुल इस्लाम उर्फ राजू बंगाली यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या चोरांनी चोरी केलेले सोने मुथूट फायनान्स, श्रीरामपूर येथे जमा करून त्यांच्याकडून गोल्ड लोन घेतल्याची कबुली पोलिसांना दिली. या गुन्हेगारांकडून पोलिसांनी दोन लाख 68 हजार 300 रुपये किमतीचे आठ तोळ्याचे सोन्याचे दागिने जप्त केले.
घरांवर पाळत ठेवून बंद घरे फोडण्याचे प्रकार
जेव्हा नागरिक घराला कुलूप लावून बाहेर काही कामानिमित्त जातात तेव्हा अशा घरांवर पाळत ठेवून घरे फोडण्याचे प्रकार श्रीरामपुरात घडताना दिसून येत आहेत.
परंतु दिवसा असे प्रकार खूप क्वचित घडताना दिसून येतात. श्रीरामपूर या ठिकाणी झालेल्या या सोन्याच्या चोरीमध्ये मात्र चोरलेल्या सोन्यावर गोल्ड लोन घेण्याची कल्पना चोरांना कशी सुचली व अशा पद्धतीने त्यांनी अगोदर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस शोध घेत आहेत.