अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात ३० ऑगस्ट रोजी सर्वच महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तसेच नंदिनी नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यातील काही गावांना पुराचा फटका बसला.

त्या अनुषंगाने शेती नुकसानीचे पंचनामे तत्काळ करावेत आणि इतर कार्यवाही बाबत जिल्हा प्रशासनाने यंत्रणांना निर्देश दिले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचीत यांनी यासंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,

उपविभागीय अधिकारी, पाथर्डी, तहसीलदार शेवगाव आणि पाथर्डी, गटविकास अधिकारी पाथर्डी आणि शेवगाव तसेच या दोन्ही तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी यांना पत्र देऊन तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. शेवगाव व पाथर्डी तालुक्यामध्ये दिनांक ३० ऑगस्ट रोजी सर्वच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली.

तसेच नंदिनी नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यातील काही गावांना पूराच्या पाण्याचा वेढा बसल्यामुळे नागरीकांची स्थानिक पथके, औरंगाबाद व एनडीआरएफ यांचेकडील पथकाद्वारे सुटका करण्यात आली व सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले.

यंत्रणांनी अतिवृष्टी व पूरामुळे बाधित कुटूंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे व त्यांचे निवासाची व भोजनाची व्यवस्था करावी. आरोग्य विभागामार्फत स्थलांतरीतांच्या औषध उपचाराची व्यवस्था करण्यात यावी. पुराचे पाणी ओसरल्यानंतर स्थानिक प्राधिकरणाद्वारे संबंधित गावांमध्ये फवारणी व इतर स्वच्छता करण्यातयावी.

अतिवृष्टी व पूरामुळे बाधित जनावरे, घर पडझड आदींचे पंचनामे तातडीने करावेत व मदतीबाबत कार्यवाही करावी. शेती पिकांचे पंचनाम्यासाठी तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांची संयुक्त पथके स्थापन करुन तातडीने पंचनामे सुरु करावेत.

शेती पिकांचे पंचनाम्यासाठी ज्या भागामध्ये नुकसान झालेले नाही त्या भागातील कर्मचारी पूल करुन घ्यावेत. तसेच शेती पिकांच्या पंचनाम्यांची कार्यवाही 2 दिवसात पुर्ण करावी व संयुक्त स्वाक्षरीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.