नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याच्या दोन्ही टोकांना सीना आणि भीमा नद्या वाहत आहेत दुथडी भरून! तालुक्याचा मध्यभाग मात्र दुष्काळाच्या छायेत

कर्जत तालुक्याच्या एका बाजू कडून सीना तर दुसऱ्या बाजूकडून भीमा नदी दुथडी भरून वाहत असताना मात्र तालुक्याचा मध्यभाग अजून देखील कोरडाठाक आहे. त्यामुळे या ठिकाणाच्या रब्बी हंगामाची अपेक्षा आता फक्त परतीच्या पावसावरच अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.

Ajay Patil
Published:
sina river

Ahmednagar News: यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाधानकारक पावसाने हजेरी लावली व महाराष्ट्रातील बहुतेक नद्या या दुथडी भरून वाहत असून अनेक छोटे-मोठे प्रकल्प हे पाण्याने भरले असल्यामुळे बऱ्याच ठिकाणचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जवळपास मिटला आहे. परंतु असे असताना देखील अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचा मध्यभाग मात्र पाण्याविना आसुसलेलाच दिसून येत आहे.

विशेष म्हणजे कर्जत तालुक्याच्या एका बाजू कडून सीना तर दुसऱ्या बाजूकडून भीमा नदी दुथडी भरून वाहत असताना मात्र तालुक्याचा मध्यभाग अजून देखील कोरडाठाक आहे. त्यामुळे या ठिकाणाच्या रब्बी हंगामाची अपेक्षा आता फक्त परतीच्या पावसावरच अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.

 कर्जत तालुक्याच्या दोन्ही बाजूला पाणीच पाणी परंतु मध्यभाग कोरडा

तालुक्याच्या एक बाजूला सीना, तर दुसऱ्या बाजूला भीमा नदी दुथडी भरून वाहत आहेत. मात्र, तरीही कर्जत तालुक्याचा बहुतांश भाग अद्यापही कोरडा आहे. थोड्याफार पावसावर खरीप हंगाम तर निघाला, पण परतीच्या पावसाने धोका दिल्यास रब्बीच्या पिकांचे नियोजन कसे होणार, या चिंतेत येथील शेतकरी आहे. चांगला पाऊस न झाल्याने कर्जतकरांचा पाणीप्रश्न कायम आहे.

कर्जत तालुक्यात यंदा सुरुवातीपासूनच अगदी वेळेवर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे तालुक्यात खरिपाच्या पेरण्या मोठ्या प्रमाणावर झाल्या. त्यातच वेळोवेळी कमी-अधिक प्रमाणावर पाऊस होत गेल्याने खरिपातील पिके जोमदार आली.

मात्र, अजूनही तालुक्यात जोरदार पाऊस झालेला नाही. सीना क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने सीना धरण भरल्याने सांडव्यातून नदीपात्रात सीना धरणात चांगल्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. मागील दीड-दोन महिन्यांपासून कुकडीचे पाणी भोसे खिंडीद्वारे सीना धरणात सोडण्यात येत आहे. त्यामुळे सीना धरण पूर्ण क्षमतेने भरले. सांडव्यातून आता पाणी वाहू लागले आहे.

राज्यात चालू वर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे उजनी धरणही पूर्ण भरले आहे. भीमा नदी आजही भरभरून वाहते आहे. त्यामुळे एकीकडे सीना धरण भरून नदी वाहती झाली, भीमाही वाहते आहे.

कर्जत तालुक्याच्या दोन्ही टोकाला असणाऱ्या नद्या दुथडी भरून वाहत असताना, कर्जत तालुक्याचा मध्य भाग कोरडाठाकच राहिला आहे. तालुक्यातील अनेक गावांत पाणीपातळी खालावली आहे.

आज जरी तालुक्याचा पाणीप्रश्न गंभीर वाटत नसला, तरी भविष्यात तो गंभीर होऊ शकतो. दोन्ही नद्यांचे लाभक्षेत्र सोडले, तर अन्य ठिकाणचा पाणीप्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत. अतिशय कमी पावसावर खरिपाची पिके तर निघाली, मात्र रब्बी हंगामाचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe