Ahmednagar Politics:- देशामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण शांत होत नाही तोपर्यंत आता महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांचे वारे जोरदार पद्धतीने वाहायला लागले आहेत व येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्याचे संकेत देखील गिरीश महाजन आणि भरत गोगावले यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत.
त्यामुळे आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असून प्रत्येक पक्षाने आपापली मोर्चेबांधणी सुरू केल्याचे आपल्याला दिसून येत आहे. तसेच महाविकास आघाडी असो की महायुती यांच्यामधील जागा वाटपाच्या प्रश्नावर देखील आता चर्चेच्या फैरी झडू लागले असून लवकर जागा वाटपा संदर्भातले चित्र देखील स्पष्ट होईल.
परंतु या सगळ्या धामधुमीत मात्र विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी व्हायला देखील आता सुरुवात झाली असून त्यामुळे काही ठिकाणी बऱ्याच पक्षांना बंडखोरीला देखील तोंड द्यावे लागू शकते की काय अशी शक्यता आहे. याच पद्धतीने जर आपण अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या व मोठ्या समजल्या जाणाऱ्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या दृष्टिकोनातून बघितले
तर या ठिकाणी देखील विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या वाढताना दिसून येत आहे. यामध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या खंद्या समर्थक समजल्या जाणाऱ्या व माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या हर्षदा काकडे यांनी देखील या विधानसभेसाठी दंड थोपटले असून कुठल्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे.
हर्षदा काकडे यांची भूमिका विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना ठरणार नुकसानदायक?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या हर्षदा काकडे यांनी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघांमधून कुठल्याही परिस्थितीमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली असल्यामुळे यांची ही भूमिका भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना धक्का देणारी ठरेल की काय अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हर्षदा काकडे यांचा राजकीय इतिहास बघितला तर एकेकाळी भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य असलेल्या हर्षदा काकडे यांना 2014 आणि 2019 या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या माध्यमातून उमेदवारी देण्यात आलेली नव्हती. परंतु आता यावेळी मात्र त्यांनी मिळेल त्या पक्षाकडून उमेदवारी करायची किंवा नाही कुठल्याही पक्षाचे तिकीट मिळाले तर अपक्ष निवडणूक लढवायची असा निश्चय केलेला आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांनी मतदारसंघांमध्ये चाचपणी देखील सुरू केली असून कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. हर्षदा काकडे आणि त्यांचे पती विद्याधर काकडे गेल्या 40 वर्षापासून या मतदारसंघात जिल्हा परिषद सदस्य असून त्यांचे कामे शैक्षणिक संस्थेच्या रूपाने व काही सामाजिक कामांमुळे या दांपत्याची शेवगाव पाथर्डी मतदारसंघांमध्ये चांगली ओळख देखील असल्याने या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना मिळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
सध्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघात भाजपच्या मोनिका राजळे आमदार असून त्यामुळे हर्षदा काकडे यांच्या भूमिकेमुळे त्याच्यापुढे अडचणी निर्माण होतील असे देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दुसरे म्हणजे जर आपण या मतदारसंघातील इच्छुकांची संख्या पाहिली तर ती देखील वाढताना दिसून येत असून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून चंद्रशेखर घुले हे देखील या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तयारीला लागल्याचे दिसून येत आहे व ते देखील मतदारसंघांमध्ये चाचपणी करत आहेत.
दुसरे म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून देखील प्रताप ढाकणे निवडणुकीची तयारी करत असून त्यांच्या माध्यमातून देखील संबंधीचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे शेवगाव पाथर्डी मतदारसंघांमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या वाढते की काय व त्यामुळे काही पक्षांना बंडखोरीच्या समस्येला सामोरे जावे लागते की काय? असे वाटण्याला वाव आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत या मतदारसंघांमध्ये आणखी किती उमेदवार उभे राहतील व कोण कोणाला पाठिंबा देईल? हे येणाऱ्या कालावधीत स्पष्ट होणार आहे.