त्याला वाचवण्याच्या प्रयत्न केला मात्र दोघांचाही मृत्यू झाला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :-  नगर तालुक्यातील निंबळक शिवारात सेफ्टीक टँकमधील मैला काढण्याचे काम सुरू असताना टँकमध्ये पडून घर मालकासह एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.(crime)

या घटनेत एक कामगार जखमी झाला आहे. घर मालक साहेबराव खेसे (वय ५०, रा.निंबळक ता. नगर) व कामगार अरूण देठे (वय ३८, रा. नागापूर) अशी मृतांची नावे आहेत.

नगर तालुक्यातील निंबळक शिवारात काल रविवारी (दि.२६) दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

निंबळक मधील पांडूरंगनगर परिसरात साहेबराव खेसे यांचे घर आहे. त्यांच्या घरातील सेफ्टी टँक भरल्यामुळे त्यातील मैला काढण्यासाठी त्यांनी रविवारी दुपारी दोन कामगारांना बोलविले होते.

टँकमधील मैला काढत असताना एक कामगार टँकमध्ये पडला. त्यापाठोपाठ दुसरा कामगारही टँकमध्ये पडला. त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असताना मालक साहेबराव टँकमध्ये पडले.

त्यातील एका कामगाराला बाहेर काढण्यात यश आले. मालक साहेबराव व कामगार देठे यांचा यामध्ये मृत्यू झाला. जखमी कामगाराविषयी एमआयडीसी पोलिसांना रात्री उशिरापर्यंत माहिती मिळाली नव्हती.

दरम्यान घटनेची माहिती निंबळक शिवारात पसरल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर सहायक निरीक्षक युवराज आठरे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.