Bhandardara Dam : भंडारदरा धरण लवकरच होणार शंभर वर्षांचं ! असा झाला होता भंडारदरा धरणाचा जन्म…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bhandardara Dam : उत्तर नगर जिल्ह्याची जीवनरेषा असलेले भंडारदरा धरण शंभरीकडे झुकत चालले असून घरणाला आज ९७ वर्षे पूर्ण झाली आहेत. अकोलेच्या पश्चिमेला असणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील रवाईच्या डोंगरातून ऊगम पावणाऱ्या

अमृतवाहिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या प्रवरा नदीवर सन १९१० ते १९२६ या दरम्यान ब्रिटीशांनी शेंडी गावाजवळ दोन टेकड्या अडवुन प्रवरेचा खळखळ वाहणारा प्रवाह अडवला आणि भंडारदरा धरणाचा जन्म झाला.

तेव्हापासून ते आजपर्यंत सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर कोसळणारे धो-धो पाणी भंडारदरा धरण आपल्या पोटात सामवुन घेत आहे. निसर्गाचे देखणे रुपडं लाभलेल्या भंडारदरा धरणाचे पाणी उत्तर नगर जिल्ह्यामधील भुमिपुत्रांच्या शेतात खेळु लागले.

त्यामुळे खऱ्या अर्थाने हरितक्रांती घडण्यास सुरुवात झाली. समृद्धीची बेटं फुलु लागली. सहकारी साखर कारखानदारी, उद्योग धंदे सुरु झाले. वर्षानुवर्षे दुष्काळाने गांजलेल्या भुमिपुत्रांच्या निरागस जिवनात भंडारदऱ्याचे पाण्याने नवचैतन्य उभे राहिले.

दुष्काळी भागामध्ये पाणी मिळावे, या उद्देशाने १९०२ साली ब्रिटीश सरकारच्या कालावधीमध्ये सिंचन आयोगाने प्रवरा खोऱ्यात धरण बांधण्याच्या योजनेवर भर दिला. त्याचाच परिणाम म्हणुन १८९९ साली ओझर येथे छोटेखानी बंधारा बांधला गेला.

धरणाला एकुण चार पाणी सोडण्याचे दरवाजे असुन त्याच्या झडपा इंग्लंडमधुन आणण्यात आल्या होत्या. आशिया खंडातील सर्वात उंच ठिकाणचे धरण म्हणुन आज भंडारदरा धरणाची गणना होत आहे.

सन १९२६ मध्ये भंडारदरा धरणाचे काम पुर्ण झाले. धरणासाठी एकुण खर्च १ कोटी १५० लाख ८३ हजार ४५१ रुपये आला. ६५० फुटाचा धरणाचा सांडवाही धरणाच्या दक्षिणेस तयार करण्यात आला.

या भंडारदरा धरणाचे सर्वेक्षण इंजिनियर ऑर्थर हिल यांनी केल्यामुळे भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्याला आर्थर लेक असे नाव देण्यात आले, तर त्याकाळचे ब्रिटीशकालीन मुंबई गव्हर्नर विल्सन यांच्या हस्ते १९२६ साली लोकार्पण करण्यात आले.

धरण भंडारदरा गावाच्या अगदी उशाला असल्याने याला भंडारदरा धरण हे नाव असले तरी कागदोपत्री आजही याला विल्सन डॅम म्हणुनच ओळखले जाते.

या धरणाच्या पाण्यावर संपूर्ण उत्तर नगर जिल्हा हरित झाला. आज भंडारदरा धरण ९७ वर्षाचे झाले असुन शंभरीकडे झुकत असतानाही अगदी ठणठणीत आहे. भंडारदरा धरणाचा परिसर हा अद्भुत निसर्गाने वेढलेला असुन दरवर्षी येथील निसर्ग पाहण्यासाठी हजारो पर्यटक भंडारदऱ्याला भेट देत असतात.