Ahilyanagar News:- या विधानसभा निवडणुकीचे निकाल जर बघितले तर ते खूपच धक्कादायक असून संपूर्ण राज्यांमधून महाविकास आघाडीचे पानिपत या निवडणुकीत झाले. त्यातल्या त्यात काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाची देखील परिस्थिती खूपच ढासळली.
त्याच दृष्टिकोनातून जर आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेसची स्थिती बघितली तर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात आज मात्र काँग्रेस अस्तित्वासाठी धडपडत आहे. अगोदर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था ते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील काही अपवाद वगळले तर याच पक्षाचा बोलबाला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये होता.
परंतु कालांतराने पक्षांतर्गत गटबाजी तसेच नवीन पक्षांचा राजकीय पटलावर झालेला उदय आणि बदलत गेलेले राजकीय समीकरणे यामुळे 1995 नंतर मात्र जिल्ह्यात काँग्रेसच्या बालेकिल्लाला सुरुंग लागायला सुरुवात झाली.
नुकतीच आपण बघितले तर गेल्या 40 वर्षापासून आपला गड शाबूत ठेवणाऱ्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना देखील संगमनेरमधून या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.
एकूण बारा उमेदवारांपैकी 10 आमदार निवडून आणण्याची ताकद असलेल्या काँग्रेसचा मात्र हा जिल्ह्यात हेमंत ओगले यांच्या रूपाने एकच आमदार यावेळी विधानसभेत पोहोचला.
अहिल्यानगर जिल्ह्यात कशी होती काँग्रेसची कामगिरी?
जर काळाच्या पटलावर आपण जरा मागे जाऊन पाहिले तर 1951 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात आठ आमदार काँग्रेसचे निवडून आले होते व सर्वाधिक आमदार निवडून आणण्याचा सपाटा 1995 च्या पंचवार्षिक पर्यंत होता. परंतु या सगळ्या गोष्टीला 1999 मध्ये धक्का लागला व यावर्षी काँग्रेसला अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला होता.
परंतु 2024 च्या विधानसभा निवडणुकीत तर नगर दक्षिण परिसरामध्ये काँग्रेसचा एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नव्हता. फक्त श्रीरामपूर, संगमनेर आणि शिर्डी या तीन मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार यावेळी रिंगणामध्ये होते व त्यातील फक्त श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसच्या पारड्यात पडली.
संगमनेरमध्ये तर बाळासाहेब थोरात यांचा नवखे असलेले उमेदवार अमोल खताळ यांनी पराभव केला व काँग्रेसला जिल्ह्यातून मोठा धक्का बसला.1995 पर्यन्त काँग्रेसचा या जिल्ह्यातील विजयरथ सुसाट होता. त्यानंतरच्या कालावधीत मात्र राजकीय पटलावर शिवसेना व भाजप युतीने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बस्तान बसवायला सुरुवात केली.
तसेच राष्ट्रवादीची 1999 मध्ये स्थापना झाली व त्यानंतर काँग्रेस मधील अनेक दिग्गज राष्ट्रवादीत गेले व काँग्रेस दुय्यमस्थानी फेकले गेले. त्यानंतर मात्र काँग्रेसच्या स्थानिक ठिकाणी पक्षाला नवीन नेतृत्व उभेच करता आले नाही.
अहिल्यानगर जिल्ह्यात या दोन नेत्यांच्या खांद्यावरच होता पक्ष
आपल्याला माहित आहे की, राज्याच्या राजकारणात बडे प्रस्थ आणि वजनदार असलेले अहिल्यानगर जिल्ह्यातील जर नेते बघितले तर ते म्हणजे बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील होय. या दोन्ही नेत्यांच्या खांद्यावरच काँग्रेसची धुरा होती.
परंतु 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपमध्ये प्रवेश केला व त्यामुळे एकट्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे काँग्रेस पक्षाची सगळी धुरा होती. परंतु या विधानसभा निवडणुकीत त्यांनाच पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये काँग्रेसला अस्तित्वासाठी खूप मोठा संघर्ष या जिल्ह्यातून करावा लागणार आहे.