Ahilyanagar News:- नुकताच विधानसभा निवडणुकांचा निकाल बघितला तर यामध्ये न भूतो न भविष्यती असा दणदणीत विजय महायुतीने मिळवला व महाविकास आघाडीचा या निवडणुकीत दणदणीत पराभव झाला. परंतु आता या निकालाच्या निमित्ताने विरोधकांकडून मात्र ईव्हीएम वर शंका उपस्थित केल्या जाऊ लागले असून अनेक ठिकाणी फेर मतमोजणीची मागणी करण्यात येत असून त्या पद्धतीने आता आवश्यक शुल्क भरून तसे अर्ज देखील दाखल करण्यात येत आहेत.
अगदी याच पद्धतीने जर आपण अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी देखील काही उमेदवारांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी केलेली आहे व त्याकरिता आवश्यक असलेले शुल्क जिल्हा निवडणूक विभागाकडे भरले आहे.
जिल्ह्यातून बाळासाहेब थोरात, राणी लंके तसेच प्राजक्त तनपुरे, संदीप वर्पे आणि सत्ताधारी असलेल्या राम शिंदे यांनी केली मतमोजणीची मागणी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे तसेच राणी लंके व संदीप वर्पे यांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी जिल्हा निवडणूक शाखेकडे केली असून त्यासाठी सर्वांनी ठराविक शुल्क देखील संबंधित विभागाकडे भरले आहे.
यामध्ये विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले क्रमांक दोन व तीन वरील उमेदवारांना 5% ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मुभा मिळते. याकरिता निकाल लागल्यानंतर सात दिवसात अशा प्रकारची मागणी करावी लागते व त्यानुसार विधानसभेला पराभूत झालेले महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात, प्राजक्ता तनपुरे तसेच राणी लंके व संदीप वर्पे या चार उमेदवारांनी मतमोजणी पडताळणीची मागणी केलेली आहे.
राहुरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे पराभूत झाले असून त्यांच्या प्रतिनिधीने जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे राहुरी मतदारसंघातील सहा मतदान केंद्रांच्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी केली आहे व त्याकरिता त्यांनी प्रति मतदान केंद्र 47 हजार 200 रुपयांप्रमाणे शुल्क भरले आहे.
तसेच संदीप वर्पे यांनी देखील स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन पोहेगाव येथील मतदान केंद्राच्या पडताळणीचे मागणी केली आहे. संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी, राजापूर तसेच जवळे कठलग, धांदरफळ, साकुर या व इतर 14 मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनच्या पडताळणीसाठी शुल्क भरल्याची माहिती समोर आलेली आहे.
पारनेर विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या राणी लंके यांनी देखील वनकुटे, भाळवणी, वडगाव गुप्ता, निंबळक, सुपा तसेच निघोजसह इतर 18 केंद्रांवरील पडताळणीची मागणी केली आहे व त्याकरिता त्यांनी आठ लाख 49 हजार 600 रुपयांचे शुल्क भरले आहे.
सत्ताधारी राम शिंदे यांनी देखील भरले शुल्क
इतकेच नाही तर सत्ताधारी महायुतीचे कर्जत जामखेड मधील पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी देखील सतरा मतदान केंद्रावरील पडताळणी करिता आठ लाख 2400 रुपयांचे शुल्क भरले असून त्यांनी कोल्हेवाडी तसेच आरणगाव, साकत, राजेवाडी, पाडळी, खर्डा, कर्जत शहर तसेच पिंपळवाडी, परीट वाडी, कोरेगावसह इतर जवळपास 17 मतदान केंद्रांची पडताळणीची मागणी केली आहे.