Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती होत असून काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती पाहायला मिळत असून प्रत्येक मतदारसंघांमध्ये प्रचाराने मोठ्या प्रमाणावर वेग घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
अगदी या अनुषंगाने जर आपण अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी प्रचारात वेग घेतला असून अनेक समाज घटकांनी त्यांना पाठिंबा दिल्याने त्यांचे पारडे जड आहे की काय? अशी परिस्थिती सध्या मतदार संघामध्ये दिसून येत आहे.
महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचाराच्या नियोजनाकरिता माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी देखील सोमवारी उपस्थिती लावली व शहरातील मंगल कार्यालयात घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला व काही आश्वासने देखील दिली.
अहिल्यानगरमध्ये एमआयडीसी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक उभारणार-डॉ. सुजय विखे पाटील
अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचाराच्या नियोजनाकरिता माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सोमवारी सायंकाळी शहरातील मंगल कार्यालयामध्ये घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली व त्यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, महायुतीतील घटक पक्षांची ताकद आमदार संग्राम जगताप यांच्या पाठीशी असून राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे.
त्यामुळे येणाऱ्या दिवसात अहिल्यानगरमध्ये एमआयडीसी तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे भव्य स्मारक आम्ही दोघे उभारणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी या निमित्ताने दिले. या बैठकीला महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर,
भाजपाचे सरचिटणीस सचिन पारखी, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे तसेच शहर प्रमुख सचिन जाधव, माजी महापौर बाबासाहेब वाकळे इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमध्ये पुढे बोलताना डॉ.सुजय विखे यांनी म्हटले की, लोकसभेला माझा पराभव झाला. परंतु नगर शहरातून मोठे मताधिक्य मिळाले.
या मताधिक्यामागे आमदार संग्राम जगताप यांनी प्रामाणिक केलेले काम असल्याचे त्यांनी म्हटले. अशीच ताकद आता घटक पक्षांनी आमदार संग्राम जगताप यांच्या पाठीशी उभी करावी. आमदार संग्राम जगताप यांना मताधिक्य देऊन भाजपसह इतर घटक पक्षाने ताकद दाखवून द्यावी असे देखील आवाहन त्यांनी या निमित्ताने उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर म्हणाले की, गेल्या महिनाभरापासून भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी महायुतीचे उमेदवार आमदार जगताप यांचा प्रचार मोठ्या प्रमाणावर करत आहेत. महायुती एकदिलाने कामाला लागली असून जगताप तिसऱ्यांदा आमदार होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.