रस्त्या अभावी रुग्णांचा डोलीमधून प्रवास

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : रस्त्या अभावी तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या वाकी मधील कळंबा वस्ती येथील रहिवासी नाथु काळू सगभोर या रुग्णाला डोली करून ३०० मीटर वरून वाकी रस्त्यावर आणले. तेथून त्यांना उपचारासाठी अकोले व पुढे पुणतांबा येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाकी परिसरातील कळंबा वस्तीवर १५ कुटुंबे राहतात. पूर्वी या वस्तीवर जाण्यासाठी बैलगाडी जात होती. वाकी रस्त्यापासून ३०० मीटरवर असलेल्या या वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमणे झाल्याने दुचाकी जाण्यायोग्य देखील रस्ता नसल्याने येथील आदिवासी ग्रामस्थांची मोठी कुचंबना होत आहे.

मंगळवारी (दि.१३) सायंकाळी डोली करून नाथु सगभोर यास त्यांच्या पत्नी गीताबाई सगभोर, जालिंदर सगभोर, दत्तू सगभोर, अक्षय सगभोर या नातेवाईकांनी डोली करून वाकी रस्त्यावर आणले. तेथून अकोले येथे पोहचविल्याने तालुक्यातील विकासकामाचे व आरोग्य यंत्रणेचे वाभाडे निघाले आहे.

दरम्यान, निवडणूका जवळ आल्याने आमदार, खासदार विकास कामासाठी कोटीच्या कोटी उड्डाणे करत असून विकास कामांचे उद्घाटनासाठी सरसावले आहे. मात्र आदिवासी भागातील जनतेला आरोग्याच्या सुविधा मिळत नसल्याची खंत नागरिकांतून व्यक्त होत आहे.

हा रस्ता व्हावा, यासाठी वाकी येथील ग्रामपंचायतने तहसीलदारांनाही निवेदन दिल्याची माहिती उपलब्ध होत आहे. या रस्त्याबरोबरच वाकी पाझर तलाव ते रंधा शिव याही रस्त्याचा असाच प्रश्न प्रलंबित आहे.

■तालुक्यात विकासकामे सुरू असले तरी वाडी वस्तीवर जाण्यास रस्ते नाही. पाण्याच्या योजना बंद आहेत. आरोग्य सेवा दुरापास्त आहे. मात्र याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. गरीब आदिवासींनी करायचे काय, असा सवाल माजी सरपंच धिरेंद्र सगभोर यांनी उपस्थित केला आहे.

■ तालुक्यातील आरोग्य सेवा मोडकळीस आल्या असून रस्त्याची कामे निकृष्ट होत असून चौकशी होण्याची गरज आहे. तालुक्यातील पाणी योजनांवर कोट्यवधी खर्च होऊनही अजूनही नळाद्वारे पाणी नाही. ही आदिवासी जनतेची फसवणूक आहे. याबाबत लोक प्रतिनिधी नेमके काय करतात, असा प्रश्न जि.प. सदस्या सुनिता भांगरे यांनी उपस्थित केला आहे.