गटनेते पदी सभापती संगीता शिंदे यांची निवड अवैध; मुरकुटेंचा मार्ग मोकळा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :-  श्रीरामपूर पंचायत समितीच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेते पदाचा सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेल्या वादावर बुधवारी महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला आहे. गटनेते पदी सभापती संगीता शिंदे यांची निवड अवैध ठरवण्यात आली आहे.

काँग्रेसच्याच सदस्या डॉ. वंदना मुरकुटे यांची गटनेते पदी नियुक्ती वैध मानण्यात आली आहे. श्रीरामपूर पंचायत समितीच्या गटनेतेपदाच्या निवडीप्रकरणी उच्च न्यायालयाने काँग्रेसच्या डॉ. वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे यांच्या बाजूने निकाल दिला असता. त्यावेळी संगिता शिंदे यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुध्द सर्वोच्च न्यायालयात अपिल केले होते.

बुधवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. आर. गवई व न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांनी उच्च न्यायालयाचा निर्णय ग्राह्य धरून संगीता शिंदे यांची याचिका फेटाळून लावली. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी जानेवारी २०२० मध्ये निवडणूक घेण्यात आली होती.

त्यात सभापती पदी काँग्रेस पक्षाच्या संगीता शिंदे या विजयी झाल्या होत्या. मात्र त्यांच्या विजयावर काँग्रेसच्याच डॉ. वंदना मुरकुटे यांनी आक्षेप घेतला होता. शिंदे यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली तसेच व्हीपचे पालन केले नाही. पक्षविरोधी कारवाई केली.

त्यामुळे त्यांना पदावरून दूर करावे, अशी मागणी डॉ. मुरकुटे यांनी काँग्रेसच्या अन्य तीन सदस्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. याच दरम्यान सभापती शिंदे यांनीही औरंगाबाद खंडपीठात याचिका केली होती. मात्र खंडपीठाने मुरकुटे यांच्याच गटनेते पदावर शिक्कामोर्तब केले होते.

अखेर सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला होता. न्यायालयाने बुधवारी आदेश पारित करत उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवले.