कर वसुली करणाऱ्या ग्रामसेवकावर जीवघेणा हल्ला..! ‘या’ तालुक्यात घडली घटना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News:ग्रामपंचायत हद्दीतील थकीत करवसुली व विनापरवाना बांधकामाची मोजणी करण्यासाठी गेलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर ७ ते ८ जणांनी प्राणघातक हल्ला केला.

यात ग्रामविकास अधिकारी जखमी झाले आहेत. ही घटना कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे घडली. याप्रकरणी एका ऑईल मिल धारकासह सात व्यक्तींविरुद्ध मिरजगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, मिरजगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी शरद कवडे येथील ऑईल मिल जवळ असलेल्या विनापरवाना इमारतीची मोजणी व थकीत कर वसुलीकरिता शुक्रवारी सकाळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह गेले होते.

यावेळी त्यांना सात ते आठ जणांनी लोखंडी पाईप व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.

याबाबत मिरजगाव पोलिस ठाण्यात ग्रामविकास अधिकारी शरद साहेबराव कवडे यांच्या फिर्यादीवरून ऑईल मिल धारक व इतर सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान ग्रामविकास अधिकाऱ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे तालुक्यासह जिल्ह्यात पडसाद उमटले आहेत. कर्जत तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने आरोपींना अटक होई पर्यंत कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.