file photo

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- फेसबुकवर व्यक्तिगत आयुष्यात त्रास असल्याची पोस्ट टाकत अखिल भारतीय छावा संघटनेच्या पैठण युवक तालुका अध्यक्षाने एस.टी.बस समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री नेवासा-नगर महामार्गावरील कांगोणी फाटयाजवळ घडली.

या घटनेमुळे पैठण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.महेश कारभारी शिंदे असे आत्महत्या करणार्‍या तरूणाचे नाव आहे. या घटनेची अधिक माहिती अशी की, महेश हा मंगळवारी घरातील कोणाला काही न सांगता आपल्या मोटारसायकलवर सकाळी दहा वाजेदरम्यान बाहेरगावी गेला होता.

गेल्या काही दिवसांपासून महेश हा तणावात होता. मात्र कोणत्या कारणाने तो तणावात होता हे त्याने कुणालाही सांगितले नाही. मृत्यू पुर्वी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास त्याने फेसबुकवर आयुष्यात खूप त्रास आहे.

माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नका. अशी पोस्ट टाकली व त्यानंतर काही वेळातच त्याने अहमदनगर-नेवासा मार्गावरील कांगोणी फाट्याजवळ दुचाकी बाजूला उभी करून भरधाव जाणार्‍या एस.टी.बस समोर उडी घेत आत्महत्या केली.

महेशला स्थानिक नागरिकांनी तातडीने नेवासा येथील शासकीय रुग्णालयात हलविले मात्र गंभीरपणे जखमी झाल्याने व अति रक्तस्त्राव झाल्याने तो पर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती.

वैद्यकीय अधिकार्‍यांनी महेशला मृत घोषित केले. ढाकेफळ पासुन जवळ असलेल्या आमरापूर वाघूडी, ता.पैठण येथे मुळगावी बुधवारी दुपारी महेशवर अंतिम संस्कार करण्यात आले. शनीशिंगणापूर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असुन मृत्युचे कारण अद्याप समजु शकले नाही.